कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे, रत्नागिरीहून महिला थेट संतोष देशमुखांच्या घरी; पोलीसही धावले
मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला अचानक पोहोचली. तसेच, फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे आहेत, असा दावा महिलेनं केला आहे.

बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंचत संतोष देशमुख (Santosh deshmukh) यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून यातील सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्यामुळे, पोलिसांकडून कृष्णा आंधळेचा शोध घेतला जात असतानाच मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिलेने धाव घेतली. विशेष म्हणजे या महिलेनं कृष्णा आंधळेबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा खळबळजनक दावा देखील केला होता. रात्रभर येथील घरासमोर (Beed) असलेल्या मंडपात त्यांनी आराम केल्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी देशमुखांच्या घरातील बाथरूममध्ये अंघोळ करण्याचा हट्ट महिलेनं केला. त्यामुळे, काही काळ देशमुख कुटुंबीयांमध्येही शंका आणि गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, पोलीस (Police) दाखल झाल्यानंतर महिला बसमध्ये बसून रत्नागिरीला परतली.
मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीयांच्या घराच्या परिसरात अज्ञात महिला अचानक पोहोचली. तसेच, या हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे आहेत म्हणत ठाण मांडून बसली. सदरील अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी 6 वाजता देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोरील पॅन्डॉलमध्ये दाखल झाली होती. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला तिने केला. मात्र, पोलिस आल्यानंतर आपलं नाव सांगण्यास देखील नकार दिला. सकाळी, अंघोळीसाठी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावं, अशी मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची, असा तिचा हट्ट होता. अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून ती महिला निघून गेली. मात्र, सदरील महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही धनंजय देशमुख यांनी म्हटलं.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे गेल्याच महिन्यात नाशिकमध्ये दिसल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. त्यानंतर, आता रत्नागिरीतील महिलेकडून असा दावा करण्यात आल्याने पोलिसांकडून त्या दिशेने तपास सुरू आहे.
महिलेबाबत काय म्हणाले धनंजय देशमुख
मला कुटुंबीयांकडून सांगण्यात आलं की, एक महिला घरी आलेली आहे, तिच्याकडून कृष्णा आंधळेबाबत काही पुरावे असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे, आम्ही याबाबत गावकरी व पोलिसांना कळवलं होतं. तसेच, रत्नागिरी पोलिसांनाही आम्ही याबाबत माहिती दिली. तेव्हा रत्नागिरी पोलिसांनी देखील या महिलेनं इथं तशाप्रकारच्या तक्रारी दिल्या आहेत. पण, आम्ही त्याची शहानिशा करत असल्याचं म्हटलं आहे. सबंधित महिला आता निघून गेल्या आहेत. या महिलेनं सकाळी अंघोळ करायचं म्हटल्यानंतर त्यांची इतरत्र सोय करण्यात आली. पण, त्यांनी आमच्या घरीच अंघोळ करायचा आग्रह केल्याने संशय निर्माण झाला. दरम्यान, रात्रभर त्या इथंच थांबलेल्या होत्या, त्यांच्या सोबतील महिला पोलीस कॉन्स्टेबलही होत्या, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली.
हेही वाचा
Congress मल्लिकार्जुन खर्गेंच्या सभेला गर्दी जमवता आली नाही; काँग्रेसकडून जिल्हाध्यक्षांचे निलंबन
























