पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. याप्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) वाल्मिक कराड याच्यावर संघटित गुन्हेगारीसाठी असलेल्या मकोका कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना घरात आसरा देणाऱ्या लोकांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तपास सुरु असल्याचे वक्तव्य बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केले. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे सांगितले. संतोष देशमुख यांचे अपहरण करताना स्विफ्ट गाडी कोणाची होती? मारेकऱ्यांना राहायला कोणी घरं दिली?, या सगळ्या गोष्टी तपासात स्पष्ट होतील. खंडणीमधील जे आरोपी होते ते कोणाच्या घरात होते, त्यांना कोणी गाड्या पुरवल्या हे सगळं समोर येईल. परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे. केजमध्ये गुंडांची प्रवृत्ती झालीय. इतर आरोपींनासुद्धा मकोका लावला पाहिजे ही आमची मागणी आहे. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवायला हवे. अॅडव्होकेट उज्वल निकम जर होकार देत नसतील तर सतीश मानेशिंदे या वकील महोदयांना हे प्रकरण द्या, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले.


बीडमध्ये जमावबंदी असतानाही परळीत आंदोलन कसे झाले? बजरंग बाप्पांचा सवाल


सुरेश धस काय म्हणतात ते मला माहिती नाही. कालपासून बीडमध्ये जमावबंदी चे आदेश लागू आहेत. हे असताना आंदोलन कसं झालं? गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळी बंद करण्याचा निर्णय घेतला. मी 100 टक्के  अमित शाह यांची भेट घेतली होती. मी त्यांना सगळे वृत्तान्त देणार आहे. 
वहिनी (वाल्मीक कराड) यांच्याबद्दल मी फारसे बोलणार नाही. मी जर वाल्मिक कराड यांना धमकी दिली तर मग एवढे दिवस का लागले बोलायला? गुंडाराज होतं, आमच्या लोकांना मारायचा प्लॅन होतो अशा गुंडांना आम्ही कशी धमकी देणार?, असा सवाल बजरंग सोनावणे यांनी उपस्थित केला.


गुन्हेगाराला कुठलीही जात नसते. काही मूठभर समाजकंटक आहेत, ज्यांना जातीय रंग द्यायचा आहे. अजितदादांनी बीडमध्ये पक्षाची कारवाई करताना थोडा उशीर केला का काय असं वाटतंय. संतोष देशमुख हत्येच्या संदर्भात जे जे आहेत जे कोणी सामील असेल या सर्वांना फाशी झाली पाहिजे. मी मागितला तर धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत का? तो सरकारचा प्रश्न आहे ते बघतील. केज प्रकरणात 50 आरोपी येतील, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले.



आणखी वाचा


रुग्णालयातून बाहेर आले; पोलीस व्हॅनमध्ये बसण्याआधी वाल्मिक कराडने 'रोहित कुठंय' विचारले, नेमकं काय घडलं?