बीड: बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले (Ranjit Kasale) याला दहा लाख रुपये दिल्याच्या आरोपानंतर खळबळ माजली होती. मात्र, हे दहा लाख रुपये रणजीत कासले (Ranjit Kasale) याच्या मुलांच्या शाळेच्या फीजसाठी दिल्याचं बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा सुदर्शन काळे यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. आपले पैसे मिळावे यासाठी काळे यांनी बीड पोलिसांना महिनाभरापूर्वीच अर्ज दिला होता. कासलेने साडेसात लाख रुपये पुन्हा दिल्याचे देखील सुदर्शन काळे यांनी म्हटले आहे. परंतु ईव्हीएम पासून दूर राहणे एन्काऊंटर करणे या आरोपात तथ्य नसल्याचे देखील सुदर्शन काळे यांनी म्हटले. 

बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काळे काय म्हणाले?

रणजीत कासले (Ranjit Kasale) यांच्या मुलाचे शिक्षणासाठी दहा लाख रुपये दिले होते. त्यांनी माझ्याकडे मुलाची फीज भरण्यासाठी पैसे मागितले होते. मी त्यांच्या बँकेत खात्यामध्ये पैसे पाठवले होते. यामध्ये बाकी कशाचाही संबंध नाही. त्यांनी माझ्याकडून शिक्षणासाठी पैसे घेतले होते. पैसे देऊन त्यांना चार-पाच महिने झाले आहेत. त्यांचा स्वतःचं निलंबन झाले तेव्हापासून त्यांनी असे आरोप चालू केले आहेत. बाकी कशाचाही संबंध नाही. कासलेला (Ranjit Kasale) पैसे देऊन चार ते पाच महिने झाले आहेत. त्याच्या खात्यावरती आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले होते. माझ्याकडे पैसे पाठवलेली पावती आणि ते सर्व पुरावे आहेत. त्यानंतर त्यांनी मला साडेसात लाख रुपये देखील परत दिले आहेत. पैसे कसे दिले आहेत त्याचा मी पोलिसांना दिलेल्या अर्जामध्ये उल्लेख केला आहे, असंही सुदर्शन काळे यांनी म्हटले. 

पुढे बोलताना ते म्हणाले, या कंपनीचा आणि वाल्मीक कराडचा काही देखील संबंध नाही. मुंडेंचा वगैरे काहीच संबंध नाही. कासले मनानेच या सर्व गोष्टी सांगत आहेत. बाकीच्यांची विनाकारण नावे घेतली जात आहेत. या सर्वामध्ये त्यांचा काही संबंध नाही. हे कन्स्ट्रक्शन माझं स्वतःच आहे. मी अंबाजोगाई येथे राहतो. माझं स्वतःचं कन्स्ट्रक्शन आहे. मुंडे देखील मला ओळखतात. मी 2004 मध्ये भाजपाच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवली होती. त्यामुळे माझ्या सर्वांशी ओळखी आहेत. मी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा मुंडे भाजप युवाचे अध्यक्ष होते. हे सर्वजण माझे परिचित आहेत. त्यांनी मला कधी असं काही करण्यासाठी सांगितलं नाही किंवा बोलले नाहीत, असंही एबीपी माझाशी बोलताना सुदर्शन काळेने सांगितलं आहे.

कासले यांनी मला त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागत असल्याने सांगितलं होतं. मुलाची फी भरायची आहे आणि शेवटची तारीख आहे. त्यामुळे मी त्यांना पैसे दिले. त्यांनी मला पैशांची वारंवार मागणी केली होती. त्यानी विनंती देखील केली होती, लेकराचे शिक्षणासाठी म्हणून मी पैसे दिले होते. कासलेने दाखवलेले ते सर्व खोटे आहे. ज्या वेळी पैसे दिले त्यावेळी मला असं वाटलं नव्हतं की ते पैसे दिल्यानंतर असे बदलतील किंवा असे वागतील पुन्हा नंतर त्यांची वागणूक समजायला लागली. मी त्यांना त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे दिले. मात्र,  आता ते पैसे एन्काऊंटरसाठी म्हणत आहेत. मी यासंबंधीचा अर्ज दिला होता. मी त्यांच्याकडे तोंडी मागणी देखील केली होती. कासले याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती होते. मी नंतर अर्ज केला. मी तीन ते चार महिने झाले त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होतो. त्यांच्या वरिष्ठांना देखील याबद्दलची माहिती होती. कासले बडतर्फ झाले तेव्हापासून त्यांनी हे सगळं सुरू केलं आहे असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

कासलेच्या विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल 

रणजीत कासलेच्या विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईच्या उपचारासाठी म्हणून अंबाजोगाईतील व्यवसायिकाकडून सहा लाख रुपये घेतले असल्याची माहिती आहे. वारंवार मागणी करूनही परत न केल्याने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याने आईच्या उपचारासाठी म्हणून अंबाजोगाई येथील व्यापाऱ्याकडून 6 लाख रुपये 2024 मध्ये घेतले होते. ते परत न केल्याने आता अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर चौधरी असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

कासले हा अंबाजोगाईमध्ये कार्यरत असताना सुधीर चौधरी यांच्याशी त्याची मैत्री होती. या मैत्रीतूनच कासले याने आईच्या उपचारासाठी म्हणून सहा लाख रुपये उसने घेतले होते. वारंवार मागणी करूनही त्याने ते परत न केल्याने आता चौधरी यांच्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात रणजीत कासले याच्यावर दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. वेगवेगळे व्हिडिओ बनवत खळबळ जनक दावे करणारा कासले हा सध्या शिवाजीनगर पोलिसांच्या कोठडीत असून यादरम्यान त्याच्यावर परळी व अंबाजोगाई येथे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत.