Santosh Deshmukh murder case : आम्ही न्याय मागण्यासाठी आलो आहे. कायदा सुव्यवस्थेचं भयानक वास्तव आहे. घडलेल्या आणि घडत असलेल्या घटना अत्यंत भयावह असल्याचे मत धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी व्यक्त केले. आम्ही तुमच्या दारात आलोय आम्हाला न्याय द्या, अशी विनंती धनंजय देशमुखांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आंना केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बारामतीत आज आक्रोश मोर्चा निघाला. यानंतर धनंजय देशमुख बोलत होते. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, पण जे लोक अशा टोळ्या सांभाळतात त्यांना थांबवले पाहिजे असे धनंजय देशमुख म्हणाले.

तुम्ही बीडचे पालकत्व घेतलं आहे. ज्यावेळी तुम्ही बीडला याल तेव्हा परिस्थिती जाणून घ्या. आमच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही कागदपत्रे पुरावे पहा आणि न्याय द्या असे वक्तव्य धनंजय देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून केलं. घटनाक्रम कसा घडला तो जाणून घ्या. दिरंगाई होत चालली आहे, याला जबाबदार कोण? कोणी जबाबदारी घ्यायची? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

दुःखाचे गाठोडे खांद्यावर घेऊन आम्ही फिरतोय

आज माझा जन्मदिवस होता. संतोष देशमुख यांनी जे गावासाठी केलं त्याची एक एक आठवण होत होती.भावनिक हो म्हणावे लागत नाही, दुःखाचे गाठोडे खांद्यावर घेऊन आम्ही फिरत आहोत. न्याय मागत आहोत. ते मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही असे धनंजय देशमुख म्हणाले. फरार आरोपीला कोणी पोसले? कोणी सांभाळ केला? कोणी फरार केलंय़ हे समोर आल्याशिवाय राहणार नाही असंही ते म्हणाले. त्याला लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्या. जे काही करायचे ते यंत्रणेने करायला हवं असंही त्यांनी सांगितलं. 

अजित पवारांना विनंती, बीड जिल्ह्यातील अराजकता बाजूला करा

आमची ठोस भूमिका ही आहे की या गुन्ह्यात कोणीही असला ज्याने काही हस्तांतरण केलं आहे. जे आठ आरोपी आहेत. जे मकोका, खून अपहरण याच्या गुन्ह्यात आहेत. यापैकी एकाच जर खून झाला असता तर धनंजय मुंडे यांची काय भूमिका राहिली असती? कसा न्याय मागितला असता? तसाच आम्ही अजितदादांना बारामतीतून आवाहन करत न्याय मागत आहोत. आम्हांला या गोष्टीचा उलघडा करा की हे आरोपी कोणाचे आहेत? कुठे राहत होते? कुठून तुमचा कारभार हाकत होते? हे सर्वांसमोर आहे ते एकदा जाणून घ्या आमचा विचार करा अशी तुम्हाला विनंती असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांना बारामतीतून हात जोडून विनंती करत आहे की आमच्या जिल्ह्यात जी अराजकता माजली आहे ती बाजूला करा. जे चुकीचे आहे ते बाजूला काढून टाका तुम्हाला कोणीही साथ द्यायची सोडणार नाही असे धनंजय देशमुख म्हणाले. 

कृष्णा आंधळे हा फरार आरोपी असताना त्याच्या जन्मदिनादिवशी त्याचे स्टेटस ठेवले जात आहेत. अशोक मोहितेवर हल्ला केला जात आहे. या घटना वारंवार घडत आहेत. शासन कडक होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत.विविध धमक्या दिल्या जात आहेत असे धनंजय देशमुख म्हणाले. जशी जशी चौकशी होईल, सप्लिमेंटरीमध्ये कोणी कोणी मदत केली ते समोर येईल. जो कोणी यांची पाठराखण करत असेल ते समोर येणार आहे.स्वतःला ते वाचवू शकतील, पण अठरा पगड जातीच्या लोकांपासून ते वाचू शकणार नाहीत असे देशमुख म्हणाले. 

अठरापगड जातीने आम्हाला सांभाळले

एका पत्रकाराने मला विचारले 90 दिवसात कुटुंबाला कसे सावरले? यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, मी कुटुंबाला नाही सांभाळले तर अठरापगड जातीने आम्हाला सांभाळले. आरोपींना फाशीच झाली पाहिजे, पण जे लोक अशा टोळ्या सांभाळतात त्यांना थांबवले पाहिजे असे धनंजय देशमुख म्हणाले. हे लोक समाजात काही चांगलं होऊ देत नाहीत. आरोपीच्या समर्थनार्थ बीड मध्ये मोर्चे काढण्यात आले हे दुर्दैवी आहे. माझ्या भावाची अपहरण करून हत्या केली. आमच्या कुटुंबाला न्यायासाठी उन्हातन्हात फिरायची वेळ या लोकांनी आणली. आपण आम्हाला शेवटपर्यंत साथ द्या. गावात कोणताच सण सूद होत नाही. कारण अण्णावर लोकांचे प्रेम होते. संतोष अण्णा गावाला सांभाळत नव्हते तर गावच अण्णाला सांभाळत होते. सरकारला आवाहन केलं आहे की गुन्हेगारीचे पाळंमुळं उखडून फेका असे धनंजय देशमुख म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Dhananjay Munde Resignation: मंत्रिपद गेलं, पण धनंजय मुंडेंना दिलासा देण्याची सरकारची तयारी, संतोष देशमुख प्रकरणात पुढे काय होणार?