बीड: बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीसह काहींच्या नावांचा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. अभिनेत्र्यांचं नाव घेतल्यामुळे हे प्रकरण चांगलच चर्चेत आलं असून या प्रकरणी अभिनेत्री प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचललं आहे. तिने सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. प्राजक्ता माळीने काल (शनिवारी) पत्रकार परिषद घेत तिचं या राजकीय घडामोडींवर आणि नाव घेण्याबाबत तिचं मत मांडलं आणि सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करत संताप व्यक्त केला. त्यानंतर आता प्राजक्ताच्या समर्थनार्थ अनेक मराठी कलाकार समोर आले आहेत. नृत्यांगना गौतमी पाटीलनेही प्राजक्ता माळीला समर्थन दिलं आहे. 


अभिनेत्रा प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ बोलताना गौतमी म्हणाली,  'कलाकार हा कलाकार असतो. त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचं समर्थन करतो', अशी प्रतिक्रिया नृत्यांगना गौतमी पाटीलने दिली आहे. मलाही याआधी अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं. मात्र मी खचून गेली नाही. त्यामुळे प्राजक्ता ताईनेही खंबीरपणे उभं राहून आपली कला सादर करत राहावी, आणि हसत राहावं, असं गौतमीनं म्हटलं आहे. गौतमी पाटील बदलापूरच्या आगरी महोत्सवात परफॉर्मन्ससाठी आली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना तिनं ही प्रतिक्रिया दिली आहे.


नेमकं काय म्हणाली गौतमी पाटील?


ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नकोस आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या, कोणत्या नेत्यासोबतच किंवा कोणाही सोबत त्याचं नाव जोडू नका. कारण कलाकाराचे दुःख हे कलाकारालाच माहिती असतं. आज कोणाला काय त्रास होतोय ते तुम्हाला माहित नाही. मलाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं गेलं. पण, माझा त्रास मला माहिती. लोकांना तो माहीत नाही. ते चुकीचं आहे. प्लीज कोणासोबत कोणाचं नाव जोडू नका उलट कलाकाराला तुम्ही सपोर्ट करा, प्राजक्ता ताई आम्ही तुझ्या सोबत आहोत. प्राजक्ता ताईनेही खंबीरपणे उभं राहून आपली कला सादर करत राहावी, आणि हसत राहावं, असं गौतमीनं म्हटलं आहे.


सुरेश धस नेमकं काय म्हणाले?


भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमात बोलतानाअभिनेत्री प्राजक्ता माळीसह काही कलाकारांचं नाव घेतलं होतं. त्यांचं घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर धस यांचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. सुरेश धस यांच्यावर अनेकांनी आरोप केले आहे. मराठी अभिनेत्रींना तुमच्या राजकारणात घेऊन ओढू नका, असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकर यांनी सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं होतं. प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानं त्यांच्यावर झालेल्या टीकेवर सुरेश धस यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.