बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडच्या अटक प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)यांच्यावर विरोधकांनी आरोपांचा हल्लाबोल केला आहे. नवनवीन आरोप आणि रोज होणाऱ्या राजकीय आरोप- प्रत्यारोपामुळे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. असं असतानाच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) काल (गुरूवारी, ता-30) भगवानगडावर पोहोचले. तिथे धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यात चर्चा देखील झाली. त्यानंतर आज (शुक्रवारी ता-31) महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भगवान गड भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका शास्त्री यांनी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस किंवा तो गुन्हेगार नाही, त्यांची पार्श्वभूमी नाही. या संपूर्ण प्रकरणाचा भयंकर मोठा परिणाम वारकरी सांप्रदायावरही झाला. मागच्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर मिडियावर ट्रायल झाली आहे, असं वक्तव्य शास्त्री यांनी केलं आहे. त्यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर दिलेल्या पाठिंब्यावर एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया म्हणाल्या, भगवान गड पवित्र ठिकाण आहे. इथून राजकारणावर बोलण्याची गरज नव्हती. नामदेवशास्त्रींना या सगळ्या प्रकरणाची माहिती नसावी, म्हणून ते बोलले असतील. धनंजय मुंडे राजकारणासाठी भगवाना गडाचा वापर करत आहेत. त्यांनी नामदेव शास्त्रींना बोलायला भाग पाडलं, पत्रकार परिषद घ्यायला लावली, असं दमानियांनी म्हटलं आहे. तर आपण देवळात जाताना शुचिर्भूत होऊ जातो. पण, भगवान गडावर जाताना धनजंय मुंडे आणि प्रत्यक्षातील ते प्रचंड वेगळे असावेत. पण धनजंय मुंडे आणि त्यांचे सहकारी काय करतात, यांची नामदेव शास्त्रींना माहिती नसेल, त्यांना मुंडेचा काळी बाजू त्यांना माहिती नसेल. ते पवित्र ठिकाणी राहतात त्यांना ग्राऊंड रिअॅलिटी माहिती नसावी. नामदेवशास्त्रींनी पत्रकार परिषद नव्हती घ्यायला पाहिजे. उद्या आणि परवा मी याप्रकरणात आणखी मोठा खुलासा करणार आहे. मी त्यांची भेट घेऊन त्यांना माझ्याकडे असलेले सर्व पुरावे दाखवेन असंही दमानियांनी म्हटलं आहे.
प्रत्यक्ष आयुष्यातले धनंजय मुंडे हे फार वेगळे..
भगवानगड अतिशय पवित्र स्थान आहे. तिथून राजकारणाबद्दल बोलण्याची खरंच काही गरज नव्हती. नामदेव शास्त्रींना या प्रकरणाची पूर्ण कल्पना नाही. त्यांनी ते पेपर बघितलेले नाहीयेत. जे घोटाळे झाले आहेत ते त्यांनी पाहिले नाहीयेत. आपण कोणीच आरोप करत नाहीये. हाकिकत मांडतो आहे आणि कदाचित ती नामदेव शास्त्रींना माहिती नसेल म्हणून ते असे बोलले असतील. पण प्रत्येक माणूस जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तो अतिशय शुचिर्भूत होऊन जातो, तसं भगवानगडावर जाताना धनंजय मुंडे आणि प्रत्यक्ष आयुष्यातले धनंजय मुंडे हे फार वेगळे आहेत आणि त्याची कल्पना नामदेव शास्त्री यांना नसेल त्यामुळे ते असं बोलले असतील असं मला वाटतं. खरी त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते काय-काय करतात आणि त्यांचे सहकारी काय काय करतात आणि कशी दहशत पसरवतात याची खालची कल्पना त्यांना नसेल. ग्राउंड रिअॅलिटी आहे ती त्यांना माहिती नसेल. कारण ते एका वेगळ्या विश्वात राहतात.ते एका पवित्र ठिकाणी राहतात आणि त्यांच्या विचार देखील तसे असतील, म्हणून त्यांना कदाचित हे सर्व काही बाजू माहिती नसेल. म्हणूनच ते असे बोलले असतील. खरं तर त्यांनी ही पत्रकार परिषद घ्यायला नको होती. राजकारण आणि याच्यात त्यांनी पडू नये, असे मला वाटतं. मला वाईट वाटलं हे बघून असे पुढे अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
राजकारणात उगाचच बोलायला लावणं चुकीचं
आमच्या काही जे सहकारी आहेत, त्यांच्यामार्फत नाहीतर, मी स्वतः भगवानगडावरती जाऊन त्यांना सर्व पेपर आणि देणार आहे. येत्या दोन दिवसात म्हणजे कदाचित उद्या किंवा परवा मी आणखी एक मोठा खुलासा करणार आहे. हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण ऑन पेपर बोलतो. आपण काय हवेत बोलत नाही. तिथे जी दहशत आहे, ती सर्वांनी पाहिलेली आहे आणि माध्यमांनी दाखवलेली दहशत आहे आणि दहशत पसरणारे हे त्यांचे लोक आहेत. हे सगळं असं असताना त्यांनी खरंच असं बोलायला नको होतं. कारण ते एक पवित्र स्थान आहे आणि त्याचा राजकारणासाठी कुठेतरी धनंजय मुंडे वापर करून घेतला आहे, असं व्हायला नको होतं तिथे जाऊन नामदेव शास्त्री यांना बोलायला भाग पाडायला नको होतं, त्यांना राजकारणात उगाचच बोलायला लावणं चुकीचं होतं, असं वाटतं असाही पुढे अंजली दमानियांनी म्हटलं आहे