Narayan Gad बीड: धाकटी पंढरी म्हणून राज्यात ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायण गडाचा (NarayanGad) वाद विकोपाला गेला आहे. महंत शिवाजी महाराज यांनी पत्रकार परिषद घेत विश्वस्त मंडळातील दोन सदस्यांवर गंभीर आरोप केलेत. 25 कोटी रुपयांच्या कामासाठी या दोघांनी गडाची बदनामी केली. तसेच पुतळा बसवण्याच्या नावाखाली पैसे जमा केल्याचा आरोप देखील महंतांनी केला. मात्र हे सर्व आरोप विश्वस्त सदस्यांनी फेटाळले आहे. मागील महिन्यात उत्तराधिकारी नियुक्तीवरून नारायण गडावरील वाद चव्हाट्यावर आला होता.
श्री क्षेत्र नारायण गड भाविकांचे श्रद्धास्थान. मात्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गडावर दसरा मेळावा घेतला आणि त्यानंतर गडावर राजकारणाची किनार दिसून आली. तर महंत शिवाजी महाराजांनी नात्यातीलच संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केल्यानंतर गडावरच काही ग्रामस्थांनी बैठक घेऊन उत्तराधिकाऱ्याला विरोध केला. त्यामुळे गडावरील वाद चव्हाट्यावर आला. दरम्यान आता महंतांनी विश्वस्त मंडळातील बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत गडाची बदनामी केल्याचं म्हटलं. पंधरा दिवसांपासून जेवलो, झोपलो का? हे सुद्धा कोणी विचारले नाही. या सर्वांने मी व्यथित झालो असून मला हे सहन होत नाही. या शब्दात मनातील भावनांना महंतांनी वाट मोकळी करून दिली.
गड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का?; बळीराम गवतेंचा सवाल
दरम्यान महंत शिवाजी महाराज यांनी केलेले आरोप विश्वस्त मंडळातील बळीराम गवते आणि भानुदास जाधव यांनी फेटाळले. भक्तांनी उत्तराधिकाऱ्याला विरोध केला. त्यामुळे याचे खापर कुणाच्यातरी डोक्यावर फोडायचे. आणि गडावर ज्याचे सर्वाधिक लक्ष त्याला बाजूला सारायचे अशी भूमिका महंतांची आहे. गडावर एकच माणूस नको हे ग्रामस्थांना मान्य नाही. गड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का? असा सवाल विश्वस्त गवते यांनी उपस्थित केला.. कुणाच्यातरी सांगण्यावरूनच हे आरोप झाल्याचं विश्वस्त सदस्यांकडून सांगण्यात आले..
बीड जिल्ह्यात धार्मिक गडांना मोठे महत्त्व-
बीड जिल्ह्यात धार्मिक गडांना मोठे महत्त्व आहे. पंकजा मुंडे यांचा भगवान भक्ती गड, श्री क्षेत्र नारायण गड, गहिनीनाथ गड, मच्छिंद्रनाथ गड आणि बीड अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भगवान गडाला मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु अलीकडच्या काळात याच गडावर राजकीय मंडळींची उपस्थिती राहिल्याने हे गड चर्चेत राहिले. आता महंत आणि विश्वस्तांच्या वादामुळे नारायण गड चर्चेत आलाय. महंत आणि विश्वस्त यांच्यातील वाद शमणार का? याकडेच लक्ष लागले आहे.