बीड : संतोष अण्णाला कपडे काढून मारलं, त्याचे फोटो पाहून काळीज हेलावून जातंय, एवढी क्रूरता करण्याचं धाडस कसं झालं? आता तरी अजित पवारांनी आणि फडणवीसांनी धनंजय मुंडेंना लाथ मारून बाहेर काढावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. धनंजय मुंडे यांनी स्वतःहून आमदारकीसह सगळ्याच पदांचा राजीनामा द्यावा, स्वतःहून जेलमध्ये जावं अशी संतापजनक प्रतिक्रिया त्यांनी दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. 


स्वतःहून राजीनामा द्यावा


मनोज जरांगे म्हणाले की, "धनंजय मुंडे यांच्यावर जर भगवानबाबांचे संस्कार असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार असतील तर मनाने आमदारकीसह सर्व पदांचा राजीनामा द्यावा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी जाऊन राजीनामा दे. तू स्वतःहून जेलमध्ये जा. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंना लाथ मारून बाहेर काढावं. असं जर केलं नाही तर थू तुमच्या जिंदगीवर. किती क्रूरपणे एखाद्याला मारलं गेलं हे समोर आलं. देखमुखांच्या पत्नीला, मुलांना, कुटुंबीयांना काय वाटत असेल."


धनंजय मुंडेच्या टोळीकडे मोर्चा


यापुढे आपला मोर्चा हा धनंजय मुंडेच्या टोळीकडे असणार आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. संतोष देशमुखांना मारताना यांनी निचपणाचा कळस केला असंही ते म्हणाले. 


अजित पवारांचं नाव या आधी आपण कधी घेतलं नाही. पण आता पहिल्यांदा सांगतोय. मुंडेला बाहेर काढलं नाही तर तुम्हाला भोगावं लागणार आहे असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. 


सरपंच हत्येचे फोटो समोर, महाराष्ट्र हादरला


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला. नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालं. आणि आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय. संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. 


हे सर्व फोटो आणि व्हिडीओ आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त केले आहेत. जवळपास 15 व्हिडीओ आणि 8 फोटो जप्त करण्यात आलेत. या व्हिडीओत सुदर्शन घुलेसह इतर आरोपीही दिसताहेत. हा व्हिडीओ वाल्मिक कराड पाहत होता. मारहाणीचे  हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही.


ही बातमी वाचा :