Manoj Jarange Patil on Beed Jail Gang War : बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि बबन गित्ते (Baban Gitte) गँगचा महादेव गिते एकमेकांना भिडल्याचे समोर आले. काल सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास गिते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. मात्र नेमकी कुणी कुणाला मारलं याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. कारण महादेव गितेनं (Mahadev Gite) वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला (Sudarshan Ghule) मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. तर दुसरीकडे वाल्मिक कराडनेच मारहाण केल्याचा दावा महादेव गिते केला आहे. तर कारागृह प्रशासनानं महादेव गित्तेचा बीड कारागृहातील मुक्कामच हलवला आहे. त्याला आता छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथील कारागृहात हलवण्यात आले आहे. आता या प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय. संतोष देशमुख प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्येच गँगवॉर होऊन सगळे संपतील, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गँगवॉर होऊन हे एकमेकांना आतमध्ये संपवतील. आरोपी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून लवकरात लवकर आरोपींना फाशी द्या. म्हणजे ते एकमेकांना संपवणार नाहीत. जिल्हा प्रशासनातील सर्वांची बदली करून तिथे नवीन स्टाफ भरायला पाहिजे. त्यांची पण चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
गृहमंत्र्यांनाच आरोपींना वाचवायचंय
कळंब शहरातील एका घरात महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं पुढे आले होते. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी (Santosh Deshmukh Murder Case) ही महिला संबंधित होती असा दावाही करण्यात आला. या महिलेची 7-8 दिवसांपूर्वी हत्या झाली होती. आता या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गृहमंत्री जाणून-बुजून हे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. यातील कोण आरोपी आहेत? कोण पोलीस आहेत? आरोपींना फरार असताना पैसे पुरवणारे कोण आहेत? या सर्वांना सह आरोपी करा. पण ते करत नाही, कारण गृहमंत्र्यांनाच आरोपींना वाचवायचे आहे. पकडलेले आरोपी खोटे बोलू शकतात. त्यांची सखोल चौकशी करायला पाहिजे. त्यांना खून कोणी करायला सांगितला होतं? या महिलेचा संतोष भैयाच्या हत्या प्रकरणात काय संबंध होता? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणी करायला लावले? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा