छत्रपती संभाजीनगर: मी संतोष देशमुख यांच्या हत्येचे समर्थन करत नाही. पण आम्हाला मंत्री होता येत नाही, खासदार-आमदार होता येत नाही. त्यामुळे आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारी माणसं तिकडे हवी आहेत. तुम्ही त्यांनाच गुन्हेगार ठरवत आहात. सुरेश धस हे संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या माध्यमातून स्वत:च्या फायद्याचे राजकारण करु पाहत आहेत. ते एका समाजाविरोधात गरळ ओकत आहेत, मोर्चे काढत आहेत. ते जाणीवपूर्व धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट करत आहेत, असा आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केला. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या सभेवेळी बोलत होते.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना संतोष देशमुख प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप केला. तसेच वाल्मिक अण्णा यांचे सर्वपक्षीय संबंध असल्याची बाब हाके यांनी अधोरेखित केली. वाल्मिक अण्णा यांचे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील एवढेच काय सुरेश धस यांच्यासोबतही फोटो आहेत. अरे तुमची माणसं निवडून आणायला वाल्मिक अण्णा चालतो, वाल्मिक अण्णांची माणसं राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ करायला चालतात. निवडणूक जिंकायला सगळ्यांना वाल्मिक अण्णा चालतात, या गोष्टी वर्षानुवर्षे चालत आल्या आहेत. निवडणुकीत त्यांच्या स्कीलचा उपयोग करुन घेतला जातो आणि आता लक्ष्य करण्यासाठी तुम्हाला फक्त धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड दिसतात. या माणसांना अडकवले जात आहे. या गोष्टी ओबीसींच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या असल्याचे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
बीडमध्ये सीआयडीच्या पथकातील अधिकाऱ्यांना जात बघून बाहेर काढले जात आहे. मग आम्हीदेखील तुमची जात काढून तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना विरोध करायचा का? बीड जिल्ह्यात सीआयडी आणि पोलिसांवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आमदार आणि खासदाराकडून होत आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
सुरेश धसांविरोधात ओबीसी समाजाचा फायरब्रँड नेता मैदानात उतरला, लक्ष्मण हाके म्हणाले....
अंतरवाली सराटीत ज्यावेळी गोळीबार झाला, पोलीस भगिनींचा विनयभंग झाला, बीड शहरात ओबीसींची घरे जाळण्यात आली, या गोष्टी सुरेश धस यांना दिसल्या नाहीत का? त्यावेळी बीड जिल्ह्यात किती पिस्तुल दिल्या, याची माहिती सरकारला नव्हती का?, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला. सुरेश धस स्वत:च्या राजकारणासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारण करत आहे. त्यांनी ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना धाकात ठेवायचे काम केले, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, पुण्यात दर दोन दिवसांनी कोयता गँगकडून हत्या होते. आज पुण्यात इंजिनियर तरुणीची हत्या झाली. स्वतःच्या जिल्ह्यात मुळशी पॅटर्न होतो. त्या जिल्ह्यासाठी शरद पवार कधी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले नाही, पत्र लिहिले नाही. शरद पवार सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला भेटायला गेले का? बहुजन समाजातील लोकांनी राजकारण करायचे नाही, यासाठी टार्गेट केले जात असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी केला.
आणखी वाचा
सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप