कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. रिव्हॉल्वर घेऊन एक इसम थेट जिल्हा सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचला. तो वारंवार कमरेला हात लावत असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली. सुरेश संभाजी नरके (वय 42, रा. वाठार तर्फे वडगाव, ता. हातकणंगले) असं त्या व्यक्तीचं नाव आहे. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पण त्यामुळे न्यायालयात असलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे मात्र धिंडवडे निघाल्याचं दिसून आलं.
नेमकं काय घडलं?
सुरेश नरके हा व्यक्ती सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कोर्टात पोहोचला होता. न्यायालयात प्रवेश केल्यानंतर तो वारंवार कमरेला हात लावत असल्याचे ड्युटीवरील पोलिस कॉन्स्टेबल संजय पारळे यांच्या लक्षात आले. त्यांनी नरके याला तत्काळ बाहेर बोलावून तपासणी केली असता, त्याच्याकडे सुमारे दीड लाख रुपये किमतीचे पिस्तूल सापडले.
या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अनिकेत कुंडले यांनी घटनास्थळी धाव घेत नरके याला ताब्यात घेतले. न्यायालय परिसरात शस्त्र घेऊन जाण्यावर स्पष्ट बंदी असतानाही नियमभंग करत पिस्तूल घेऊन आल्याबद्दल नरकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरके याने 2017 मध्ये जमिनीच्या वादात पेठ वडगाव पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर होणार होती. या सुनावणीसाठीच तो कोर्टात आला होता.
दरम्यान, न्यायालयासारख्या उच्च सुरक्षा क्षेत्रातही असा प्रकार घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुरेश नरकेचा पिस्तूल परवाना रद्द होणार
सुरेश नरके याचा पिस्तूल परवाना रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नरकेला 2022 साली पिस्तूल परवाना मिळाला असून त्याची मुदत ही डिसेंबर 2028 पर्यंत आहे. त्याच्या या कारनाम्यामुळे त्याचा पिस्तूल परवाना रद्द होणार आहे.
सुरक्षेचे धिंडवडे
जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमध्ये पोलिसांनाही शस्त्र घेऊन जाता येत नाहीत. अशा स्थितीत सुनावणीसाठी आलेला एखादा व्यक्ती पिस्तूल कसा काय घेऊन जाऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी असलेली मेटल डिटेक्टर सुविधा काम करत नव्हती का? तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला तपासले नव्हते का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र या निमित्ताने न्यायालयाच्या सुरक्षेचे धिंडवडे निघाले आहेत हे मात्र नक्की.
ही बातमी वाचा: