बीड: राज्याचे मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आहेत. या बैठकीला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे, भाजप आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) देखील उपस्थित आहेत. अजित पवार (Ajit Pawar)यांना घेवून जाण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरमधून पंकजा मुंडे बीडला पोहोचल्या. त्यांच्या या एंन्ट्रीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुरुवातीच्या दौऱ्यानुसार अजित पवार (Ajit Pawar)हे छत्रपती संभाजीनगर मधून हेलिकॉप्टरने बीडला सकाळी येणार होते. मात्र, छत्रपती संभाजीनगरमधून अजित पवार हे कारने बीडला आले. साडेनऊ वाजता पंकजा मुंडे या अजित पवारांना (Ajit Pawar) घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टरने बीडला पोहोचल्या.


दरम्यान, आता याच हेलिकॉप्टरमधून अजित पवार हे दुपारी दोन वाजता पुण्याला जाणार आहेत. तर पंकजा मुंडे ही आढावा बैठक संपल्यानंतर बीडहून कारने परळीला जाणार असल्याची माहिती आहे. अजित पवारांचा आजचा बीड दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या ऐवजी अजित पवार यांनी पुण्यासह बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीकडे आणि अजित पवारांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 


अजित पवारांनी घेतली बीड जिल्हा समितीची बैठक


बीड जिल्हा समितीची बैठक आज पालकमंत्री अजित पवारांनी घेतली. याबाबतची माहिती देताना अजित पवार म्हणाले, आज बीड जिल्हा समितीची बैठक पार पडली. यावेळी सर्व संबंधित विभागांकडून सुरू असलेल्या कामांचा आणि भविष्यातील योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा पातळीवरील नागरी समस्या, सुरक्षा यांसारख्या विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. प्रत्येकानं आपापल्या जबाबदाऱ्या नेटानं पार पाडाव्यात, असं या निमित्याने स्पष्ट केलं.


धनंजय मुंडेंचा मुक्काम आज अहिल्यानगरच्या भगवानगडावर


आज अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, त्यांनी यावेळी बैठक देखील घेतली. या बैठकीला धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह अन्य अधिकारी आणि आमदार उपस्थित होते, दरम्यान आज बीडमधील जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवानगडावर आज मुक्कामी जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे वेगवेगळ्या आरोपांमुळे वारंवार चर्चेत आहेत. धनंजय मुंडे आज त्यांचे ऊर्जास्थान असलेल्या भगवानगडावर मुक्कामी जात आहेत. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर मुंडे अहिल्यानगर जिल्हयात जात असून तेथून ते भगवानगडावर मुक्काम करतील. उद्या सकाळी ते भगवानगडावरुन परळीत परतणार असून दोन दिवस परळीत राहणार आहेत.