Beed News : गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात (Beed District) खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा (पॅथॉलॉजिकल लॅब्स) मध्ये रुग्णांचे रक्त नमुने व तपासणी करण्याची नियमानुसार पद्धती अवलंबली जात नसल्याचे समोर आले आहे. सोबतच जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची संख्या देखील वाढत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी यात लक्ष घातले आहे. तसेच बीड जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळाच्या तपासण्या करण्याचे आदेशही दिले आहेत.
खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळा (पॅथॉलॉजिकल लॅब्स) मध्ये रुग्णांचे रक्त नमुने व तपासणी करण्याची नियमानुसार पद्धती अवलंबली जात नाही. तसेच प्रशिक्षित प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा काही पॅथॉलॉजिकल लॅब्स मध्ये उपस्थित नसल्याचे नमूद करण्यात आल्याने बीड येथील खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांची नियमानुसार तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहे. तसेच यावेळी बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी स्थापन केलेल्या तालुकास्तरीय समितीने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल प्रत्येक महिन्यास सादर केला जावा आणि जिल्हास्तरीय समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यानंतर घेण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी केल्या आहे.
बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश
बोगस डॉक्टरांना प्रतिबंध घालण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करण्यात आले असून, त्यामध्ये वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी विस्तार अधिकारी तसेच तहसील व पोलीस विभागाचे प्रतिनिधी आहेत. बोगस डॉक्टर बाबतच्या 62 केसेस जिल्ह्यात दाखल असून, यापैकी 32 न्यायप्रविष्ठ आहेत. सन 2019-20 या वर्षात तीन प्रकरणे दाखल झाली होती. 20 -21 या वर्षात एक व 21-22 या वर्षात दोन बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र असे असताना अजूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी बोगस डॉक्टर आहे. त्यामुळे आता प्रशासनाने अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरु केली आहे.
बैठकीत यांची उपस्थिती...
बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या प्रसंगी जिल्हाधिकारी मुधोळ मुंडे बोलत होत्या. बैठकीस पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक (गृह) पी एन शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ पी के पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे विधी सल्लागार अॅड. जोशी, अशासकीय सदस्य आर टी गर्जे, शेख सिराज हे उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
Beed News: गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना 1 मे पासून जीपीएस बंधनकारक, अन्यथा कठोर कारवाई