Dnyaneshwari Munde : वाल्मिक कराडच्या मुलांपासून आपल्या कुटुंबाला धोका, ज्ञानेश्वरी मुंडेंचा पोलिसात अर्ज, मुलांना मारहाण झाल्याचा माहिती
Mahadev Munde Murder : आपल्या मुलांना किंवा परिवारातील सदस्यांना जर काही झालं तर त्याला वाल्मिक कराडची दोन्ही मुलं जबाबदार असतील असा अर्ज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षकांना दिला आहे.

बीड : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा हत्येचा तपास सुरू असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आपल्या मुलांना आणि परिवाराला वाल्मिक कराडच्या मुलांपासून धोका आहे, त्यामुळे पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली. आपल्या दोन मुलांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, उद्या त्यांना काही झालं तर पोलीस प्रशासन आणि वाल्मिक कराडची दोन्ही मुलं जबाबदार असतील असंही ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या.
महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. वाल्मिक कराड सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात आहे. परंतु त्याची दोन मुलं, सुशील कराड आणि गणेश कराड यांच्यापासून आपल्या परिवाराला धोका आहे अशी तक्रार महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे.
वाल्मिक कराडची दोन मुले, सुशील कराड आणि गणेश कराड यांच्याकडून माझ्या परिवारातील सदस्य दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे, माझा भाऊ सतीश फड, वडील भगवान फड यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. माझ्या परिवारातील या सदस्यांबाबत काही अनपेक्षित घटना घडल्यास सुशील कराड आणि गणेश कराड हे जबाबदार राहतील असा तक्रार अर्ज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
Mahadev Munde Murder Case : मुलांना मारहाणीचा प्रयत्न
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या की, "19 फेब्रुवारी रोजी माझी दोन्ही मुलं, प्रवीण मुंडे आणि प्रणव मुंडे हे दोघे घरी येत होते. त्यावेळी त्यांना एका तरुणाकडून शिवीगाळीचा आणि मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. 'बाल्या' असं त्याचं नाव असून त्याच्या इन्स्टाग्रामवर फक्त वाल्मिक कराडचे स्टेटस दिसून येतं. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांना काही झालं तर त्याला वाल्मिक कराडची मुलं जबाबदार असतील."
आपल्या पतीच्या हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गित्ते हा अद्याप बाहेर असून त्याच्यापासून आपल्याला धोका असल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची माहिती घेतली असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहेत अशी माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली.
दरम्यान, महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या दोघांची नार्को टेस्ट झाल्याची माहिती समोर आली होती. त्या पाठोपाठ आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबाला धोका असल्याची तक्रार केली आहे.
ही बातमी वाचा:























