Santosh Deshmukh Case : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला (Sarpanch Santosh Deshmukh Murder Case) आज एक महिना पूर्ण झाला आहे. या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक तसेच सत्ताधारी नेतेही करताना दिसत आहेत. तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एबीपी माझाशी बोलताना संतोष देशमुख यांचे कुटुंबीय भावूक झाल्याचे दिसून आले. 


संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख म्हणाले की, आम्ही सर्व कुटुंब कायम सोबत असायचो. आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी भेटायला बोलावलं आणि आम्ही गेलो. खूप भयानक परिस्थिती आहे. आम्ही यातून कधीही सावरू शकत नाही. प्रसार माध्यमांपुढे, लोकांसमोर आणि आपले मोर्चे असतात तिथे गेलो की वेळ निघून जातो. आमचे सगळे सांत्वन करतात, त्यांच्यामुळे थोडसं वाटतं की सगळे आपल्या सोबत आहेत. आपला एक भाऊ गेला तर लाखो भाऊ आपल्या पाठीमागे देऊन गेला, असे वाटते. पण ज्यावेळेस आम्ही घरात येतो आणि कुटुंब सर्व एकमेकांना बघतो. तेव्हा प्रत्येक गोष्टीत दादाची आठवण येते. आता आमच्याकडे कुठलाच पर्याय नाही. आमच्या कुटुंबावर खूप वाईट परिस्थिती आहे, असे त्यांनी म्हटले. 


भांडणाच्या दिवशी दादासोबत खूप बोललो


संतोष देशमुख आणि तुमची शेवटची भेट कधी झाली होती? असे विचारले असता धनंजय देशमुख म्हणाले की, सहा तारखेला हे भांडण झालं, त्या दिवशी साडेसहा ते सातच्या दरम्यान आम्ही खूप चर्चा केली होती. दीदीच्या लग्नाचा आमचा विषय झाला. पण काळाने इतका घाला घातला की, आमचं सगळं मोडून गेलं आहे.  माझा भाऊ आमच्यासाठी एक वडील म्हणूनच होता. कुटुंबाचा खूप मोठा आधार होता. माझ्या दादाबद्दल शब्दातून व्यक्त होणे, शक्य नाही. मला आता इतकंच वाटतंय की या लेकरांवर काय वेळ आली आहे? आयुष्यात कितीही कष्ट करावे लागले तरी या लेकरांना मी एकटे पडू देणार नाही. माझा दादा आज नाही पण माझ्या दादा सोबतच्या आठवणी कायम सोबत आहे. आम्ही खूप आनंदी होतो, आमच्याकडे काही नव्हतं. पण आम्ही खूप सुखी होतो. जगात कोणाकडे जितकं सुख नसेल, तितकं आमच्याकडे होतं. आम्हाला इतर कुठल्या अपेक्षा नव्हत्या. कारण आमच्या गरजा खूप छोट्या होत्या. आम्हाला कधी मोठ्या गाडीत फिरायची हौस नव्हती. आम्ही खूप साध्या पद्धतीने आयुष्य जगत होतो. आता आयुष्य कसं जगावं? हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.  


माझे दुःख दुसऱ्या कोणत्या मुलीवर येऊ नये : वैभवी देशमुख


संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख म्हणाली की, असे दृश्य आम्ही याआधी कधीच पाहिले नव्हते. हे दृश्य अतिशय भयंकर आहे. माझ्या वडिलांची हत्या झाली. जनतेवर जो अन्याय झाला त्याच्या विरोधात आपण लढा सुरू केला. ते लढत आपल्याला सुरू ठेवायचे आहे आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला वडिलांची आठवण येते. आज ते असते आणि जर दुसऱ्या सोबत असे घडले असते तर त्यांनी सुद्धा याबाबत ठाम भूमिका घेऊन न्याय दिला असता. माझ्या वडिलांवर जो अन्याय झालाय, त्याच्या विरोधात आम्हाला न्याय हवा. ज्या वेळेस सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. त्यावेळी माझ्या वडिलांना न्याय मिळेल. त्यासाठी मी पोलीस प्रशासनाला विनंती करते की, या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. त्याला तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना सहआरोपी करून त्यांनाही कठोर शिक्षा द्या. वडील गेल्याचे दुःख आज मला कळत आहे. माझे दुःख दुसऱ्या कोणत्या मुलीवर येऊ नये, हे दुःख खूप भयानक आहे, असे बोलत वैभवी भावूक झाल्याची दिसून आली. 


 



आणखी वाचा 


Ajit Pawar: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट