Beed News: बीड (Beed) जिल्ह्यातून एक वेगळीच आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकदा पतीकडून पत्नीवर अत्याचार झाल्याच्या घटना चर्चेत येतात; मात्र येथे पत्नी नांदत नसल्याने “पोलिसांनी (Police) माझा संसार बसवून द्यावा,” अशी मागणी करत एका तरुणाने आतापर्यंत पाच वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. आता या तरुणाने सहाव्यांदा टोकाचे पाऊल उचलत आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
नितीन उबाळे असे या तरुणाचे नाव असून, त्याने आज प्रजासत्ताक दिनाचे (Republic Day 2026) औचित्य साधत बीड जिल्हाधिकारी कार्यालय (Beed District Collector Office) परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीवर चढून आत्महत्येचा इशारा दिला. यामुळे प्रशासन आणि पोलिसांमध्ये एकच धावपळ उडाली.
Beed News: तरुणाचे सहाव्यांदा आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन उबाळे पत्नी नांदत नसल्याने मानसिक तणावात असून, या प्रश्नावर तो गेल्या काही काळापासून प्रशासनाकडे न्याय मागत आहे. “माझा संसार वाचवा,” अशी मागणी करत त्याने यापूर्वी पाच वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याचा जीव वाचवला आहे.आज पुन्हा एकदा सहाव्यांदा आंदोलन सुरू झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Beed News: इमारतीवरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नितीनला समजावून सांगण्याचे आणि सुरक्षितपणे खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि समुपदेशकही त्याच्याशी संवाद साधत असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.
Beed News: जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सखाराम बागलाने या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलीस प्रशासनाने रोखल्याने पुढील अनर्थ टळला आहे. बीड तालुक्यातील काकडहिरा येथे रेल्वे विभागाने जमीन संपादित केली. याच ठिकाणी बारा ते पंधरा मीटर उंचीचा मातीचा भराव केल्यानं शेतकऱ्याच्या शेतात पावसाचे पाणी साचून पिकांचे नुकसान होते. 2016 पासून या शेतकऱ्याने प्रशासनाकडे याचा पाठपुरावा केला. मात्र कोणतीच दखल घेतली जात नसल्याने आज प्रजासत्ताक दिनी बागलाने यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून प्रशासन शेतकऱ्याकडून माहिती घेत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
