Beed News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. यानंतर ओबीसी आरक्षण (OBC Reservation) संपल्याच्या विचाराने मानसिक तणावात असलेल्या एका ऑटोचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील टोकवाडी येथे उघडकीस आली आहे. आत्माराम गणपत भांगे (वय 45) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवले.

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ (Beed News)

आत्माराम भांगे हे व्यावसायिक ऑटोचालक होते. त्यांना दोन मुले आदित्य व आदर्श असून दोघांनीही शिक्षण पूर्ण करून पोलीस भरतीसाठी मेहनत सुरू केली होती. मात्र, काही दिवसांपासून ओबीसी आरक्षण संपल्याच्या विचाराने ते तणावात होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगे हे घरात शांत व गप्प राहू लागले होते. सतत "आता मुलांना आरक्षण नाही, नोकरी लागणार नाही," या विचारात ते अस्वस्थ होते.

पत्नी व मुलगा शेतात गेले, घरात उचललं टोकाचं पाऊल (Beed News)

पत्नी व मुलगा शेतात गेले असताना आत्माराम भांगे हे घरात एकटेच होते. यावेळी त्यांनी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. शेतातून परतलेल्या कुटुंबीयांना ही धक्कादायक बाब लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात आत्माराम भांगे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यात "ओबीसी आरक्षण संपल्यामुळे मी आत्महत्या करत आहे," असे लिहिलेले आढळले अजे. या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण टोकवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Continues below advertisement

याआधीही आत्महत्येच्या घटना (OBC Reservation)

दरम्यान, 11 सप्टेंबरला लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील 35 वर्षीय तरुण भरत कराड यांनी ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याने मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून आपली व्यथा मांडली होती. भरत कराड यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसींचे कायमस्वरूपी आरक्षण धोक्यात आले आहे. आमच्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतले जात आहे. यामुळे पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाणार आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. तर धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा गावात 55 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. मयत शेतकऱ्याचे नाव माणिकराव डोईफोडे असे असून, ओबीसी आरक्षण जाणार या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला होता.

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal on Ajit Pawar : आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही; छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवरच पलटवार