Beed News: ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका ऊसतोड कामगार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या या भीषण अपघातात कुटुंबाचा कर्ता पुरुष काळाच्या पडद्याआड गेला. विशेष म्हणजे, मयत गणेश डोंगरे (Ganesh Dongare) हा सोशल मीडियावरील रीलस्टार (Reelstar) होता आणि दुर्दैवाने त्याची पत्नी फेसबुक लाईव्ह करत असतानाच तिच्या डोळ्यादेखत हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण बीडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. उसाच्या हंगामात येथील लाखो कुटुंबे उदरनिर्वाहासाठी राज्याच्या विविध भागांत तसेच परराज्यात ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील रहिवासी गणेश डोंगरे आणि त्यांची पत्नी अश्विनी हेही पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडणीसाठी बाहेर पडले होते. मेहनतीच्या घामातून आपल्या कुटुंबाचं भविष्य घडवण्याचं स्वप्न उराशी बाळगून गणेश डोंगरे हे पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणीसाठी गेले होते. मात्र, ऊस वाहतुकीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर ट्रॉली त्यांच्या अंगावरून गेल्याने गणेश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी आणि तीन चिमुकल्या मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Beed News: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन करायचे ऊसतोडणीचे काम
वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी (सोन्नाखोटा) येथील गणेश डोंगरे यांच्याकडे केवळ एक एकर जमीन होती. भोळसर वृद्ध आई-वडील असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी गणेश यांच्या खांद्यावर होती. पत्नी अश्विनी ही गुणवान आणि कष्टाळू होती. मात्र, तीन मुलींचे पालनपोषण, आई-वडिलांची जबाबदारी आणि वाढता खर्च यामुळे गावाकडील उत्पन्न अपुरे पडत होते. पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाला अत्यंत नाजूक आर्थिक परिस्थितीशी झुंज द्यावी लागत होती. त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी गणेश आणि अश्विनी यांनी मुंगळा ट्रॅक्टरद्वारे ऊसतोडणी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही वर्षांपासून हे दाम्पत्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन ऊसतोडणीचे काम करत होते.
Beed News: अंगावरुन ट्रॅक्टरची ट्रॉली गेल्याने मृत्यू
यावर्षी ते लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आपल्या चिमुकल्या मुलींसह ऊसतोडणी करत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घेऊन ते साखर कारखान्यावर माप होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते. याच वेळी जवळून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली अचानक गणेश यांच्या अंगावर कोसळली. या भीषण अपघातात गणेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक कामगार जखमी झाला. काही क्षणांतच अश्विनीच्या डोळ्यांसमोर होत्याचं नव्हतं झालं.
Beed News: पत्नी फेसबुक लाईव्ह करतानाच आक्रित घडलं
या दुर्घटनेला आणखी वेदनादायक बनवणारी बाब म्हणजे, अपघाताच्या वेळी अश्विनी फेसबुकवर लाईव्ह होती. लाईव्ह सुरू असतानाच ट्रॉली गणेश यांच्या अंगावर पडली. पतीचा मृत्यू पत्नीच्या डोळ्यादेखत घडताच तिच्यावर जणू आभाळ कोसळलं. काही क्षणांतच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पसरली आणि संपूर्ण जिल्हा अक्षरशः हादरून गेला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा