बीड : राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीनं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पूरस्थिती निर्माण झालीय. अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या पुरानं मराठवाड्यात मोठं नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी सावरगाव घाट येथे आयोजित केल्या जाणारा दसरा मेळावा साध्या पद्धतीनं आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून दसरा मेळावा साध्या पद्धतीनं आयोजित केला जाईल, अशी माहिती दिली आहे. तर, मनोज जरांगे यांचा नारायणगड येथे होणारा दसरा मेळावा देखील साध्या पद्धतीनं होणार आहे. मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याचं हे दुसरं वर्ष आहे.  

Continues below advertisement

Pankaja Munde Dasara Melava : पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा साध्या पद्धतीनं 

दरवर्षी प्रमाणे पंकजा मुंडे यांचा यंदाचा दसरा मेळावा आयोजित केला जाणार आहे. गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळावा सुरु केला होता. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेतात. गेल्या दहा वर्षांपासून बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा घेतात. भगवानबाबा यांचं जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो. मराठवाड्यातील परिस्थिती आणि बीड जिल्ह्यातील पूरस्थिती पाहता अतिशय साध्या पद्धतीनं पार पडणार आहे. सावरगाव घाट येथे देखील दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी तयारी सुरु झालीय.

 ​पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा प्रामुख्याने बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे संत भगवान बाबांच्या जन्मभूमी असलेल्या भगवान भक्तीगडावर होतो. पूर्वी हा दसरा मेळावा अहिल्यानगर जिल्ह्यातील भगवान गडावर होत असे, परंतु 2016 च्या वादानंतर सावरगाव घाट येथे मेळावा घेण्यास पंकजा मुंडे यांनी सुरुवात केली.  भगवान गडावर दसरा मेळावा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केला होता. दसरा मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे पुढे चालवत आहेत. या मेळाव्याला ऊसतोड कामगार आणि 18 पगड जातीचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

Continues below advertisement

​या मेळाव्यातून पंकजा मुंडे राज्यभरातील आपल्या समर्थकांशी संवाद साधतात आणि अनेकदा राजकीय भूमिका किंवा पुढील दिशा स्पष्ट करतात.  या मेळाव्यासाठी राज्यभरातून त्यांचे समर्थक आणि भगवान बाबांचे भक्त मोठ्या संख्येने येतात. महायुतीच्या माध्यमातून मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर मागील वर्षापासून, त्यांचे बंधू आणि धनंजय मुंडे देखील या मेळाव्याला उपस्थित राहत आहेत. मात्र, यंदा पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीनं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर सावरगाव घाट येथील दसरा मेळावा साध्या पद्धतीनं होणार आहे. 

Manoj Jarange Dasara Melava : नारायणगड येथे मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा देखील साध्या पद्धतीनं

मराठवाडा आणि विशेषतः बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने यंदा श्रीक्षेत्र नारायण गडावरील मनोज जरांगे पाटील यांचा होणारा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे साधा पद्धतीने होणार आहे. या मेळाव्याची तयारी नारायण गडावर पूर्ण होतेय. मागील वर्षी नारायण गडावर भव्य स्वरूपात मेळावा झाला. मात्र, सध्या शेतकरी अडचणीत असल्याने हा मेळावा साध्या पद्धतीने होईल आणि नारायणगड स्वतः हा दसरा मेळावा घेत आहे. तर पूरग्रस्तांना देखील मदत केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती गडाच्या महंतांनी आणि समन्वयकांनी दिली आहे.