बीड: बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांना धर्म परिवर्तन (conversion) करण्यासाठी दबाव आणला जातो. त्यासाठी त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप बंदिवान कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी केला आहे. बीड (Beed News) जिल्हा कारागृहातील चार कैदी वकील राहुल आघाव यांच्याकडे पक्षकार म्हणून आहेत आणि याच कैद्याच्या लेखी तक्रारीवरून वकील राहुल आघाव यांनी पत्रकार परिषद घेत जिल्हा कारागृह अधीक्षक वेटर्स गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (conversion)
Beed News: मानसिक व शारीरिक छळ केला जातो
तीन हिंदू आणि एक मुस्लिम पक्षकारावर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्म परिवर्तनासाठी दबाव आणतात. धर्म परिवर्तन करत नसल्यास त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जातो. त्यामुळे जिल्हा कारागृहात सध्या दहशतीचे वातावरण असल्याचा गंभीर आरोप आघाव यांनी यावेळी केला. दरम्यान या प्रकरणी उच्च न्यायालयात कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याचंही ऍडव्होकेट आघाव यांनी म्हटलं आहे.(Beed News)
Beed News: पडळकर यांनी केलेले आरोप
दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीडचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची तक्रार केली. पेट्रस गायकवाड यांनी धर्मांतर करण्याचं काम सुरू केल्याचाही आरोप पडळकर यांनी केला होता. आज दुसऱ्या दिवशी चक्क वकिलाने पत्रकार परिषद घेऊन धर्मांतरांचा मुद्दा छेडल्याने बीड जिल्हा कारागृह आणि कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत.
Beed News: पैसे, गाडी आणि बंगल्याचे आमिष
त्याचबरोबर कारागृहात धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. त्यांना पैसे, गाडी आणि बंगल्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा गंभीर आरोप करीत तीन कैद्यांनी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव, अपर पोलिस महासंचालकांसह सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याची माहिती कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कारागृहातील महिला कर्मचाऱ्यांचाही छळ केल्याचा दावा त्यांनी केला. काल (सोमवारी) भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही असेच आरोप केले होते.
तक्रारदार बीडच्या कारागृहात विविध गुन्ह्यांत बंदी आहेत. येथील अधीक्षक आपल्यावर धर्मातरासाठी दबाव आणत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. तसेच महापुरुष, संत, महंतांचे फोटो काढून त्या ठिकाणी बायबलचे वाक्य लिहिले. धर्मांतर करणे हा कायद्याने गुन्हा असतानाही शासकीय अधिकारी असलेले अधीक्षक पेट्रस गायकवाड हेच याचे उल्लंघन करीत आहेत. त्यांचे निलंबन करून कारवाई करावी, अशी मागणीही अॅड. आघाव यांनी केली आहे.
Beed News: ‘जेवणातून विषबाधा करून ठार मारू’
अॅड. आघाव यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, त्यांच्या पक्षकारांना अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी “जेवणातून विषबाधा करून मारू” अशी धमकी दिली आहे. यासोबतच धर्मांतरासाठी लाखो रुपयांचे आमिष दाखविण्यात आले असून, लवकरच या प्रकरणाची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Beed News: ‘धर्मांतर केल्यास गुन्ह्यातून मुक्तता’
हिंदू कैद्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास दाखल गुन्ह्यांमधून मुक्तता मिळेल, असे आमिष गायकवाड देत असल्याचा आरोप अॅड. आघाव यांनी केला. ते पुढे म्हणाले, “गायकवाड म्हणतात की न्यायालयात आपली ओळख आहे, सर्व काही मॅनेज करू.” या संदर्भात ई-मेलद्वारे तक्रार पाठवण्यात आली असून, आज (बुधवारी) कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार सादर केली जाणार आहे.
Beed News: ‘धर्म प्रचारकांचे वारंवार प्रवेश’
अॅड. आघाव यांनी दावा केला की, पेट्रस गायकवाड यांच्या काळात संजय गायकवाड नावाचे धर्म प्रचारक वारंवार कारागृहात प्रवेश करत असतात. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास हा प्रकार उघड होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच हिंदू कैद्यांना ख्रिश्चन करण्याचे प्रयत्न सुरू असून, भजनासह पारंपरिक धार्मिक प्रथा रोखण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
Beed News: ‘वादग्रस्त अधिकाऱ्यावर कारवाई का नाही?’
अॅड. आघाव यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “पेट्रस गायकवाड यांच्यावर वारंवार वादग्रस्त कारवाया असूनही प्रशासन त्यांना पाठीशी का घालत आहे?” जळगावमध्ये त्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल असून, त्या काळात त्यांना निलंबित करण्यात आले होते. बीड जिल्ह्यातील कार्यकाळात कैद्यांकडे मोबाइल आणि गांजा आढळल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल झाले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.