Beed News: बीड (Beed) जिल्ह्यातील एका दुर्दैवी अपघातानंतर घडलेल्या मानवी संवेदनांचा स्पर्श करणाऱ्या घटनेने अनेकांना भावूक केले आहे. दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र या दु:खद प्रसंगातही कुटुंबाने मोठ्या मनाने घेतलेल्या निर्णयामुळे एका गरजू रुग्णाला नवजीवन मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे गाडे कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील संग्राम गाडे हा तरुण मित्रासोबत दुचाकीवरून पुण्याकडे जात असताना बारामतीजवळ त्यांचा अपघात झाला. या अपघातात संग्रामच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्याच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. 

Beed News: उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी संग्रामवर अथक प्रयत्न करून उपचार केले. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गाडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Continues below advertisement

Beed News: कुटुंबीयांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

संग्रामचे वडील रमेश गाडे हे चहा विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलाच्या अकाली मृत्यूने संपूर्ण कुटुंब हादरून गेले होते. मात्र या दु:खाच्या प्रसंगातही त्यांनी मानवतेचे मोठे उदाहरण घालून दिले. डॉक्टरांनी संग्राम ब्रेन डेड झाल्याचे सांगितल्यानंतर त्याच्या वडिलांनी आणि कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. “माझा मुलगा गेला, पण त्याचे अवयव दुसऱ्या कुणाला तरी जीवन देतील, यापेक्षा मोठं समाधान नाही,” असे भावनिक शब्द संग्रामच्या वडिलांनी व्यक्त केले.

Beed News: अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले

जिल्हा रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संग्रामचा मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आला. तरुण मुलाच्या मृत्यूचे दु:ख मनात ठेवूनही गाडे कुटुंबाने घेतलेल्या या उदात्त निर्णयाने अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या घटनेमुळे मानवतेचा खरा अर्थ पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून समाजात अवयवदानाबाबत सकारात्मक संदेशही दिला गेला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Beed Crime Santosh Deshmukh Case: मोठी बातमी: सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी 14 महिन्यांनंतर जेलबाहेर येणार, कोर्टाकडून विशेष परवानगी; नेमकं कारण काय?

Nashik Crime News: नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणाचा खळबळजनक अँगल, पतीचे विवाहबाह्य संबंध अन् छळ; माहेरच्यांकडून गंभीर आरोप