Beed News: बीड जिल्ह्यातील वडवणी (Wadwani) येथे बुलढाणा अर्बन बँक (Buldhana Urban Co-operative Credit Society) बंद होणार असल्याच्या अफवेने मोठी खळबळ उडाली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर बचत खात्यातील रक्कम काढण्यासाठी तसेच तारण ठेवलेले सोने सोडवून घेण्यासाठी खातेदारांनी बँक शाखेत पहाटेपर्यंत गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Continues below advertisement

गेल्या काही वर्षांत ज्ञानराधा पतसंस्थेसह काही मल्टीस्टेट बँका आणि पतसंस्थांनी खातेदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडवून गाशा गुंडाळल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यातच बुलढाणा अर्बन बँकेची वडवणी शाखा बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरली आणि अनेक खातेदारांनी आपली रक्कम सुरक्षित काढून घेण्यासाठी बँकेकडे धाव घेतली.

Beed News: बँकेबाहेर पहाटेपर्यंत नागरिकांच्या रांगा

आज पहाटेपर्यंत बँक शाखेबाहेर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रांग लागली होती. काही खातेदारांनी खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्याचा आग्रह धरला, तर काहींनी सोन्याचे कर्ज फेडून तारणातील दागिने परत घेण्यास प्राधान्य दिले. या अचानक वाढलेल्या व्यवहारांमुळे बँक कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त ताण आला होता.

Continues below advertisement

Beed News: व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बँकेचे स्पष्टीकरण 

दरम्यान, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची स्थापना सन 1986 मध्ये राधेश्याम देवकिसन चांडक यांनी सहकार चळवळीवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने केली. त्या काळात सहकार क्षेत्राकडे साशंकतेने पाहिले जात असताना, बुलढाणा अर्बन ही एक अग्रगण्य संस्था ठरली. सूक्ष्म वित्तपुरवठा (मायक्रोफायनान्स), नाविन्यपूर्ण बँकिंग उपाययोजना आणि सामाजिक-आर्थिक उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना सक्षम करण्याचे कार्य या संस्थेने केले आहे. बीड जिल्ह्यात बुलढाणा अर्बन बँकेच्या एकूण 13 शाखा असून उर्वरित सर्व शाखांमध्ये कामकाज सुरळीत सुरू आहे. केवळ वडवणी शाखेबाबतच अफवा पसरवण्यात आली होती. मात्र, बँकेच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक प्रशासनाने खातेदारांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी थेट बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Beed crime: बीडमध्ये गुंडाराज, टोळक्याने बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचं डोकं फोडलं, नेकनूरमध्ये दोन गटात हाणामारी

Latur Kalyan Jan Kalyan Highway: लातूर–कल्याण महामार्गाला विरोध, धाराशिवमध्ये सर्वपक्षीय नेते एकटवले, हायवेचा प्रस्तावित मार्ग बदलणार?