बीड: आखाती देशांत उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील काही देशांत परिणाम झाला असून इंधन पुरवठ्यावर विशेषत: परिणाम झाल्याचे समजते. भारतात व्यवसायिक सिलेंडरचा (Gas) तुटवडा जाणवत असून घरगुती गॅसचाही तुटवडा असल्याने नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा घातल्या आहेत. किमान एक तरी घरगुती गॅस सिलेंडर मिळावा यासाठी भर उन्हात सर्वसामान्य नागरिक तासनतास रांगेमध्ये उभा राहत असल्याचं चित्र अनेक जिल्ह्यात दिसून येते. बीड (Beed) शहरातही परिस्थिती वेगळी नाही. मात्र, लोकांच्या याच गर्दीचा फायदा घेऊन बीडमध्ये सिलेंडरचे वितरण करणाऱ्या डिलिव्हरी मॅनकडून काळाबाजार कसा होतो याचं वास्तव एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलंय. 

बीड शहरातील एका गॅस एजन्सी बाहेरचे हे चित्र आहे. सर्वसामान्य ग्राहकाला 25 दिवसांच्या कालावधीत केवळ एक सिलेंडर नोंद केल्याशिवाय आणि ओटीपी दिल्याशिवाय मिळत नाही. परंतु बीडमध्ये एका सिलेंडर मागे दोनशे रुपये दिल्यास अगदी सहज सिलेंडर उपलब्ध होतो. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो पाहिल्यानंतर आपल्याला सर्व प्रक्रिया लक्षात येईल. विशेष म्हणजे दुसऱ्या ग्राहकांच्या नावे नोंद करून क्षणार्धात ओटीपी दिला जातो. एकीकडे काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु, दुसरीकडे काही जणांना यातून पैसे कमवण्याचं साधन मिळाले आहे.

दोघांमधील संवाद

रिपोर्टर आणि गॅस एजन्सी कामगारातील संवाद

रिपोर्टर - रूमवर सिलेंडर नाही अडचण आहे 

कामगार - बुकिंगशिवाय देत नाहीत, त्यासाठी ओटीपी लागतो. माझ्याकडे ओटीपी आहे सर्व तयार आहे, कुणालाही देत नाही पण तुम्हाला गरज आहे म्हणून देतो 

रिपोर्टर - गोडाऊनला जावं लागेल का?

कामगार - इथे पैसे भरून गोडाऊनला जावं लागेल 

रिपोर्टर - यांना दोनशे रुपये देऊन टाकू 

कामगार - हे नाव काय आहे पहा हे (गव्हाणे) लक्षात ठेवा, लिहून घ्या नाव विचारलं तर गव्हाणे म्हणायचं घ्या लिहून. नुसतं गव्हाणे म्हणा ओटीपी नंबर घ्या..

रिपोर्टर - शंभर रुपये घ्या ना (तडजोड केली)

कामगार - नाही तुम्हाला द्यायला लागलो, नाही तर कुणालाच देत नाही. त्यांना हा नंबर सांगा आणि ओटीपी सांगा 

कामगार - मी इथेच आहे, देऊन टाका कवर वाट बसावं एक जण नंबरला लागा तिथे गेल्यावर सहा अंकी नंबर सांगा संपला विषय 

रिपोर्टर - तुम्हाला किती द्यायचे 

कामगार - दोनशे द्या ना

गॅस एजन्सी कामगार आणि रिपोर्टर (बोगस ग्राहक) यांच्यातील हा संवाद स्टिंग ऑपरेशनमधून समोर आलाय. 

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार

बीड जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा सुरळीत पुरवठा व्हावा. या दृष्टीने जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी गॅस वितरकांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत टोल फ्री नंबरसह दरपत्रक लावण्याच्या सक्त सूचना गॅस एजन्सीला दिल्या आहेत. जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. त्यामुळे कोणीही भीतीपोटी बुकिंग करू नये. आवश्यकता असेल तेवढा गॅस सर्वांना मिळेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. तर घरगुती गॅसचा व्यवसायासाठी वापर करू नये अन्यथा पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. याबरोबरच जास्त दराने गॅस विक्री आढळून आल्यास नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे, असेही जॉन्सन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण