Beed Flood: रानात कणसं  कापायला गेलो होतो.  लई पूर आला . आमच्या हातातून निसटलं पोर . आम्ही आरडाओरडा केला . पण आजूबाजूला गडी माणसंही नव्हती . नंतर शोधाशोध झाली . तो कुठेही सापडत नव्हता . पावसाच्या नंतर सापडला . पाणी खूप असल्यामुळं काहीच करता आलं नाही . आमच्या जवळच होता . हातातून निसटून पूराच्या पाण्यात पडला . बाजरीची कणसं काटायला रानात गेलो होतो . त्याला सुट्टी असल्यामुळे रानात येण्यासाठी हट्ट करत होता . तासभर शोधल्यानंतर सापडला . आदित्यच्या अचानक जाण्यानं माऊलीच्या डोळ्यात अश्रू आवरत नव्हते .

Continues below advertisement

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी अचानक गावात मुसळधार पाऊस सुरू झाला. काही क्षणांतच बिंदुसरा नदीला पूर आला आणि गावकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला. नदीकाठच्या पिकांसह शेतातील जनावरं वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. या गडबडीत चौथीत शिकणारा दहा वर्षांचा आदित्य कळसाने आईसोबत शेतात गेला होता. पाऊस वाढला, जनावरं पुराच्या पाण्यात अडकली आणि गावकरी त्यांना वाचवण्यासाठी झटू लागले. पण या गडबडीत प्रचंड पुराच्या लाटांनी आदित्यला गाठलं. आईच्या डोळ्यासमोरून तिचं लेकरू हातातून निसटून वाहून गेलं. रानात जाताना नदीला पाणी आलं. सगळ हातातून गेलं .रविवार होता. शाळांना सुट्टी होती. त्यामुळे शेतात घेऊन गेले होते. आमच्या गावात पाऊस होता.  हे बोलताना आदित्यच्या आजीचा अश्रूंचा बांध फुटला होता.

आईच्या डोळ्यांसमोर घेतला अखेरचा श्वास

लेकरू डोळ्यांसमोरून वाहून जात असतानाही आई आरती काही करू शकली नाही. हात पसरूनही तिला आदित्य वाचवता आला नाही. तिच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू, तिच्या आवाजात दाटलेला हुंदका पाहणाऱ्यांच्या हृदयाला पिळवटून टाकणारा होता.गावकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरून शोध सुरू केला. जवळपास तासाभरानंतर आदित्यचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. छोट्या चिमुकल्याला अशा अवस्थेत पाहून संपूर्ण गाव सुन्न झालं. कुणाच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते.

Continues below advertisement

कळसाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आदित्य गेल्यापासून घरात चूलही पेटलेली नाही. आई निशब्द झाली आहे. नातवाला गमावल्याने आजीचा हुंदका थांबत नाही. घरातील प्रत्येक कोपऱ्यात आदित्यच्या आठवणींची सावली आहे. नेहमी दुष्काळाशी लढणाऱ्या बीड जिल्ह्यात यंदा पावसानेच शोकांतिका घडवली. एका बाजूला शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, तर दुसऱ्या बाजूला एका चिमुकल्याचा जीव गेला.

हेही वाचा 

आईच्या डोळ्यांदेखत लेकरू पुरात वाहून गेलं, तासाभराने मृतदेह समोर; बीडचं कुटुंब उध्वस्त, घरात चूलही पेटली नाही