Beed: गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या तुफान पावसाने बीडच्या आष्टी तालुक्यात  काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. (Onion) कांदा आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथे महेश दरेकर या शेतकऱ्याने उसनवारी करून तीन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी कांदा शेतात काढून ठेवला होता. मात्र, पावसाने उघडीप न दिल्याने दरेकर यांच्या शेतातील जवळपास 300 गोणी एवढा कांदा पावसात पूर्णपणे भिजला आहे. वडिलांनी पिकवलेलं 'सोनं' वेचण्यासाठी आता सहा वर्षांच्या मुलीसह कुटुंबाची धडपड सुरुय.  भर पावसात आता दरेकर कुटुंब आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीसह कांदा गोळा करत आहेत. या कुटुंबाची पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेलीय. (Rain)

Continues below advertisement

तीन एकरातील कांदा पाण्यात

बीडमधील आष्टी तालुक्यातील शिंदेवाडीतील शेतकरी महेश दरेकर या शेतकऱ्याचा तीन एकरातील कांदा गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने पूर्णपणे भिजला आहे. बाजारपेठेत नेण्यासाठी बाहेर काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेलीय. कांद्याचा या कुटुंबाचा एकूण खर्च 80-90 हजारांच्या घरात आहे. पण आता ज्यातून उत्पन्न मिळणार होतं तो कांदाच भिजल्यानं कुटुंब हवालदिल झाले आहे. मजुरांचे पैसे देणे बाकी आहेत. पेरणीचे दिवस आलेत अशातच खत, बी- बियाणे आणायचे कुठून? मुलांची फी भरायची कशी? असा प्रश्न या कुटुंबाला पडलाय. प्रशासनाने पंचनामे करून शासकीय मदत द्यावी,अशी मागणी दरेकर कुटुंब करत आहे. 

पावसाचा जोर वाढला

बीड जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसांपासून तुफान पाऊस कोसळतोय. वळवाच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यभरात सध्या पूर्वमान्सूनने हजेरी लावली असून पावसाने मोठी पडझडही झालीय. रस्त्यावर पाणीच पाणी झाले असून बीडच्या माजलगाव धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे.

Continues below advertisement

माजलगाव धरणातील पाणी पातळी 2 सेंटीमीटरने वाढली

गेल्या चाळीस वर्षात प्रथमच मे महिन्यात  पाणीपातळी वाढली आहे.मागील चार दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळी 2 सेंटीमीटरने वाढली आहे. माजलगाव धरणाच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात अवकाळी पावसामुळे मे महिन्यात प्रथमच पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणात सध्या 426.35 मीटर एवढी पाणीपातळी वाढली आहे. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असले तरी सर्वसामान्यांना देखील दिलासा मिळाला आहे.

हिंगोलीतील शेतकऱ्यांची हळद भिजली

मागील काही दिवसापासून सातत्याने हिंगोली जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस होतोय या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. हळदीची काढणी केल्यानंतर शिजवून ही हळद वाळण्यासाठी शेतात ठेवली होती. मात्र, जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील शिंगी नागा या गावातील शेतकरी गजानन गीते यांची हळद पूर्णपणे पाण्यात भिजली आहे. सातत्याने पाऊस पडत असल्याने या ठिकाणी शेतीला काहीसं तळ्याचे स्वरूपाला होतं. या पाण्यामध्ये वाळू घातलेली हळद पूर्णपणे भिजून गेली होती. साधारण 15 क्विंटल हळद पाण्यात भिजली आहे. याच हळदीचा एक एक तुकडा पाण्यामधून सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या वतीने केला जातोय , आता ही हळद पूर्णपणे पाण्यात भिजली आहे. त्यामुळे हळद वाळायला सुद्धा वेळ लागणार आहे. त्याचबरोबर आता ही हळद पाण्यात भिजल्यामुळे बाजारात भाव सुद्धा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

हेही वाचा:

मान्सूनचं आगमन! कोकण किनारपट्टीवर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा अंदाज काय?