Beed: ध्वजारोहणानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना संतापलेल्या एका माजी सैनिकाने काळा झेंडा दाखवत निषेध नोंदवल्याची घटना समोर येतेय. बीड जिल्ह्यात  आज कृषीमंत्री धनंजय मुंडे ध्वजारोहण करण्यास आले होते. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेल्या आंदोलकांना भेट देत असताना हा प्रकार घडला. 


नक्की झाले काय?


स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आंदोलकांची भेट घेतली.  धरणे आंदोलनाला बसलेल्या आदोलकांसमोर गेले असता माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी शेतजमिनीच्या हक्काबाबत प्रशासनाचे लक्ष नसल्याचे सांगितले. त्यानंतर संतापातच त्यांनी आपल्या खिशातील काळा रुमाल दाखवत आपला निषेध नोंदवला. तो रुमाल सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेत त्यांना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यापासून दूर नेले. वाघमारे यांच्या शेतजमिनीच्या वादाप्रकरणी पोलिसात तक्रार देऊनही गुन्हा दाखल केला जात नसल्याच्या मागणीसाठी ते अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत.  .तसेच वाघमारे यांनी यावेळी क्षीरसागर,पंकजा मुंडे यांच्यावरचा आपला रोष वाघमारे यांनी व्यक्त केलेला व्हिडिओही समोर आला आहे.


ध्वजारोहणानंतर घडला प्रकार


ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. झेंडावंदनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आंदोलकांची भेट घेत होते. त्यावेळी हा प्रकार घडला. संतापाच्या भरात माजी सैनिकाने खिशातील काळा रुमाल धनंजय मुंडेंसमोर फडकवला. यानंतर त्यांच्या बाजूला असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्या हातातील काळा ध्वज काढून घेतला. 


राज्यात सध्या विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु आहे. आज बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आली. यात आगामी विधानसभेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. यातही उपमुख्यमंत्री अजित पवारांसह, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधल्याचे दिसले. दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनीही बीडच्या शिवस्वराज्य यात्रेत धनंजय मुंडेंना घेरल्याचं दिसून आलं.