Beed: बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मकोका कोर्टात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली . आरांपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल पावणेदोन तास जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे .
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. एवढंच नव्हे तर या खटल्यातील इतर आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मागणीवरही त्यांनी ठाम आक्षेप घेतला. “हा खटला गंभीर असून आरोपींना कोणतीही सवलत मिळू नये,” असा ठाम पवित्रा निकम यांनी न्यायालयात मांडला. आरोपींना जामीन मिळतो का, दोषमुक्त केले जाते का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे आता सर्वांचं डोळे लागले असून या दिवशी न्यायालयीन निर्णयाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.
आज सुनावणीत काय घडलं?
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडच्या जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला. या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे याने दाखल केलेल्या दोषमुक्ती अर्जावरही निकम यांनी सडेतोड युक्तिवाद केला. आजची सुनावणी तब्बल तीन तास पार पडली.. यामध्ये वाल्मीक कराडच्या वकिलाने 1 तास 45 मिनिटे युक्तिवाद केला..
अटक करताना कराडला अटकेची कारणे सांगितली गेली नव्हती. मात्र, निकम यांनी हा दावा खोडून काढला. तसेच आवादा कंपनीचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलची तारीख चुकीची असल्याचा आरोपींचा दावा निकम यांनी सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड्स) सादर करून फेटाळला. "सीडीआरनुसार कराडने त्या दिवशी फोन केल्याची नोंद आहे," असे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या संभाषणाशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे योग्य वेळी सादर केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
विष्णू चाटेच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद
विष्णू चाटेच्या वकिलांनी त्याच्यावर कोणताही गुन्हा नसल्याचा दावा केला. यावर निकम यांनी चाटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालयासमोर मांडली. खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे हा वाल्मीक कराडचा 'उजवा हात' होता आणि त्याने कराडला पूर्णपणे सहकार्य केले," असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले. मकोका कायद्याच्या तरतुदी या गुन्ह्याला लागू होतात, आरोपीला नाही," असे स्पष्ट करत त्यांनी चाटेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्याची मागणी केली.या दोन्ही प्रकरणांवर आता 30 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
वाल्मिक कराडचे वकील हायकोर्टात दाद मागणार
22 जुलै रोजी विशेष मकोका न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर कराडच्या वकिलाने म्हणणे मांडले होते. यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद करून कराडच्या दोष मुक्ती अर्जाला कडाडून विरोध केला होता. कराडचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याच्या वकिलांकडून उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगण्यात आले आहे. या प्रकरणात आज तब्बल तीन तास न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपी वाल्मीक कराडच्या वकिलाने तब्बल 1 तास 45 मिनिटांचा युक्तिवाद करीत त्याची बाजू जोरदार मांडली. मात्र न्यायालयाने कोणताही निर्णय न देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.