Beed Crime : बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील पाटोदा पोलीस ठाण्याच्या (Patoda Police Station) बीट अंमलदाराने महिलादिनीच (International Women's Day 2025) एका महिलेवर बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव गडकर असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून अंमलदारावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील एक महिला मागील प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यात ये-जा करीत होती. यावेळी पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर या कर्मचाऱ्याच्या ती महिला संपर्कात आली होती. यानंतर बीट अंमलदार आणि महिलेत मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. यातून त्यांच्यात संभाषण होऊ लागले.
पोलीस कर्मचारी ताब्यात
या संधीचा फायदा घेत त्या कर्मचाऱ्याने महिला दिनाचे निमित्त सांगून त्या महिलेला पाटोदा येथे बोलावून घेतले होते. ती महिला पाटोद्यात आली असता स्टेट बँकेच्या बाजूला घेऊन जात त्याने महिलेवर बलात्कार केला. यावेळी त्या महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला चोरीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत बलात्कार करण्यात आला. याबाबत पीडित महिलेने पाटोदा पोलीस ठाण्यात येवून पोलीस निरीक्षकांना आपबिती सांगितली. या प्रकरणी पोलीस कर्मचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचारी उद्धव गडकर याला ताब्यात घेतलं आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
आज शिरूर बंदची हाक
दरम्यान, बीडच्या शिरूर कासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ व खोक्याला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली असून पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सह अनेक जन सहभागी होणार आहेत. आरोपीला वाचवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. पोलीस सतीश भोसले अटक कधी करणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी! भर रस्त्यात अश्लील चाळे भोवले, माफीनामा, शरणागतीनंतर गौरव अहुजाला कराड पोलिसांंकडून अटक
