Beed Crime News बीड: बीड जिल्ह्याचे अप्पर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी गुन्हे दाखल असलेल्या 260 शस्त्र परवानाधारकांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसद्वारे गुन्हा दाखल असल्यामुळे तुमच्याकडे असलेला शस्त्र परवाना का रद्द करु नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 


अप्पर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी गुन्हे दाखल असलेल्या 260 शस्त्र परवानाधारकांना काढलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, पोलीस अधीक्षकांच्या पत्रान्वेय गुन्हे दाखल असलेल्यांची माहिती कार्यालयास प्राप्त झाली. आपल्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे शस्त्र अधिनियम 1959 मधील तरतुदीनुसार देण्यात आलेला शस्त्र परवाना रद्द का करण्यात येऊ नये याचा खुलासा 31 डिसेंबर पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांचे समक्ष उपस्थित राहून सादर करावा, अन्यथा आपले काही म्हणणे नाही, असे समजून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.. अशी नोटीस शस्त्र परवानाधारकांना देण्यात आली.


बीड जिल्ह्यात गुन्हे दाखल असलेले 260 शस्त्र परवाने रद्द होणार?


बीड जिल्ह्यात 16 गुन्हे नोंद असलेल्याकडे शस्त्र परवाना असल्याचे समोर आले होते. शिवाय जिल्ह्यातील 260 जणांवर गुन्हा दाखल असून त्यांचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र जिल्हा प्रशासनाकडून हे परवाने रद्द करण्यासाठी चालढकल केली जात होती. अखेर 26 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील गुन्हे नोंद असलेल्या तब्बल 260 जणांना नोटीस देण्यात आलीय. त्यामुळे हे शस्त्र परवाने रद्द होणार असल्याचे दिसत आहे. 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश-


बीड प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरु करा, तसेच बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक प्रशांत बुरडे यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यातील काही नेत्यांचे बंदुकीतून गोळी झाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. बंदुकीसह ज्यांचे- ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. बंदुकीचे जे परवाने दिलेले आहेत, त्यांचा तातडीने फेरआढावा घ्या, असे निर्देश देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आले आहेत. 


संबंधित बातमी:


Jitendra Awhad Whatsapp Viral Chat: 'मंत्री कसा राहतो, ''अजित'' पक्षात कसा ठेवतो बघू'; जितेंद्र आव्हाडांची चॅट व्हायरल, नेमकं खरं काय?