Beed Crime : बीडमधील परळी येथे शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास शिवराज दिवटे (Shivraj Divate) या तरुणाला समाधान मुंडे (Samadhan Munde) आणि त्याच्या दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या टोळक्याने त्याचे अपहरण करून त्याला डोंगराळ भागात नेले आणि बांबू व लाकडी दांडक्यांनी अमानुष मारहाण केली. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात (Beed Crime) खळबळ उडाली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शिवराज दिवटे याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी परळी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. तर या प्रकरणात काही अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. आता यावरून भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी शिवराज दिवटे प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा, अल्पवयीन मुलांवर पोरशे कार प्रकरणाचा धागा पकडून कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
सुरेश धस म्हणाले की, शिवराज दिवटे याला झालेल्या मारहाणीची घटना अमानवी आहे. पोलीस दलाने जे चुकीचे वागतील त्यांची जनतेतून धिंड काढावी. त्याशिवाय हे लोक वठणीवर येणार नाहीत. सरपंच देशमुख यांना ज्या पद्धतीने मारले आहे, तीच सगळी भाषा शिवराज दिवटे प्रकरणात आहे, असे त्यांनी म्हटले.
अंबाजोगाई रुग्णालयातील डॉक्टरांचे गुन्हेगारांना अभय
सुरेश धस पुढे म्हणाले की, अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातील काही डॉक्टर एकाच ठिकाणी पंधरा वर्षांपासून आहे. हेच डॉक्टर पाय मोडला तरी खरचटले म्हणून अहवाल देतात. त्यामुळे हे डॉक्टर मकोकामध्ये आरोपी झाले पाहिजे, याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. अंबाजोगाई रुग्णालयातील डॉक्टर गुन्हेगारांना अभय देते. महादेव मुंडे यांच्या प्रकरणात देखील हेच लोक आहेत, असे आरोप त्यांनी यावेळी केलाय.
पुण्यातील पोरशे कार प्रकरणातील धागा पकडून कारवाई व्हावी
शिवराज दिवटे प्रकरणात आरोपींवर मकोका लावला जावा. तर उर्वरित दोन अल्पवयीन मुलांवर पुण्यातील पोरशे कार प्रकरणातील धागा पकडून त्यांच्यावर कारवाई व्हावी. ज्या ठिकाणी या आरोपींनी गुन्हा केला, त्या ठिकाणी आरोपींना हातकडी घालून रस्त्यावर फिरवावे, जेणेकरुन इतर आरोपींच्या मनात भीती निर्माण होईल. यातील आरोपींचे फोटो आकासोबत बाहेर पडले आहेत. त्यामुळे हे लोक कुणाचे आहेत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पोलिसांनी आरोपींची धिंड काढावी
उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार येथे येत आहेत. त्यांनी बैठकीपूर्वी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलावं. हे सत्र बंद व्हायला तयार नाही, पोलिसांनी आरोपींची धिंड काढावी. त्याशिवाय हे थांबणार नाही. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत, त्यांच्यावर मकोका लावावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त
भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला युद्धाची गरज नाही, बलुचिस्तानला पाठींबा देऊ, असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले होते. याबाबत विचारले असता दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त, 74 वर्षांपासून बलुचिस्तानचा लढा सुरू आहे. पाकिस्तानातील 44 टक्के भाग बलुचिस्तानचा आहे आणि त्याच बलुचिस्तानकडून पाकिस्तान आम्हाला नको, अशी मागणी आहे. त्यांचे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार मदत करणार, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा