Beed Crime News: पुण्यात रिक्षा चालवायचा, आई-बाप उसतोड मजूर; पोलीस भरतीत 1600 मीटरचा ‘टॉपर’ ठरला अन् काळाने झडप घातली, बीडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना
Beed Crime News: बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

Beed Crime News: राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असून हजारो तरुण-तरुणी पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मैदानी चाचण्यांसाठी मैदानात उतरले आहेत. मात्र बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळजनक घटना घडली असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी भरती प्रक्रियेत सहभागी झालेला एक तरुण 1600 मीटर धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर काही वेळातच मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मैदानावर आपल्या मेहनतीचं आणि जिद्दीचं प्रदर्शन करत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
Beed Crime News: पुण्यात रिक्षा चालवून उदरनिर्वाह
मृत तरुणाचे नाव दीपक भास्कर वाव्हळे (वय 26) असून तो बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मांडखेल येथील रहिवासी होता. दीपक पुण्यात रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र पोलिस बनण्याचं स्वप्न मनात बाळगून तो गेल्या दोन महिन्यांपासून गावी येऊन नियमित सराव करत होता.
Beed Crime News: 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत पहिल्या क्रमांकावर
बुधवारी दुपारी सुमारे 12.55 वाजता दीपकने प्रचंड जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर 1600 मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत तो प्रथम क्रमांकावर आला होता. मात्र विजयाचा क्षण साजरा करण्याआधीच काही वेळात त्याच्या आयुष्यावर दुर्दैवाने विराम लागला.
Beed Crime News: काही वेळातच हृदयविकाराचा तीव्र झटका
धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर काही वेळातच दीपकला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे पोलीस भरतीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला आणि उमेदवारांसह उपस्थितांचे डोळे पाणावले.
Beed Crime News: आई-बाप उसतोड मजूर
दीपक हा आपल्या कुटुंबातील मोठा मुलगा होता. त्याचे वडील ऊसतोडणी ट्रॅक्टरवर मजूर म्हणून काम करतात, तर आई शेतमजुरी करून कुटुंब चालवते. दीपकचा हा पोलीस भरतीसाठीचा पहिलाच प्रयत्न होता. मात्र दुर्दैवाने त्याचं पोलिस होण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं. एकुलत्या लेकाच्या अकाली मृत्यूने आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मांडखेल परिसरात शोककळा पसरली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
























