बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये विजयसिंह बांगर यांच्या पत्नीशी वाल्मीक कराड संवाद साधत असल्याचे ऐकायला मिळते आहे. यामध्ये संबंधीत महिलेने सोशल मिडीयात केलेली पोस्ट डिलीट करा म्हणून वाल्मीक कराड विनंती करत असून सदर महिला मात्र विजयसिंह बांगर यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांकडून झालेल्या छळाचा पाढा वाचून दाखवत वाल्मीक कराडला मदतीची विनंती करते. यावर वाल्मीक कराडकडून मदतीचे आश्वासन देखील दिले जाते. ABP माझा या क्लिपची पुष्टी करत नाही
दरम्यान, वाल्मीक कराडचे एकेकाळचे सहकारी विजयसिंह बांगर यांनी काही दिवसांपासून वाल्मीक कराडविरोधात पत्रकार परिषद घेत वेगवेगळे खळबळजनक आरोप केलेले आहेत. यानंतर आता विजयसिंह बांगरच्या पत्नीशी संवाद साधत असलेली वाल्मीक कराडची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्याने चर्चा होऊ लागली आहे.
काय म्हटलंय व्हायरल ऑडीओ क्लिपमध्ये
यामध्ये संबंधीत महिलेने सोशल मिडीयात केलेली पोस्ट डिलीट करा म्हणून वाल्मीक कराड विनंती करत असून सदर महिला मात्र विजयसिंह बांगर यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांकडून झालेल्या छळाचा पाढा वाचून दाखवत वाल्मीक कराडला मदतीची विनंती करते. ते माझ्यावर आरोप करतात. चार वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं, ते मला व्यवस्थित नांदवत नाहीत. मारहाण करतात, त्यांची आई आणि बहिण यामध्ये सामील आहेत, ते त्याला पाठिंबा देतात.माझ्या पोटात बाळ असताना त्यांनी मला त्यांनी ते खाली करायला सांगितलं होतं, माझ्या बाळाला दोन वर्षे झाली त्यांनी कसलीही मदत केलेली नाही. माझ्या बाळाच्या वाढदिवसाला बोलवलं पण ते आले नाहीत, त्यांनी मला घराबाहेर काढलं, माझ्या वडीलांकडून यांनी हुंडा घेतला, यांना काय कमी आहे, त्यांनी माझ्या घरच्यांकडून कर्ज घेतलेलं हुडांसाठी ते अजूनही माझे घरचे फेडत आहेत, लग्नाच्या दिवशी त्यांनी घरच्यांना माझ्या वेठीस धरलं आणि पाच लाख रूपये घेतले. मला घराबाहेर काढल्यापासून घरी ती एक मुलगी आहे. त्यांना त्या मुलीशी लग्न करायचंय काय मला अंदाज नाहीये, त्यांनी काही करण्याआधी मला मोकळं करणं गरजेचं आहे,घरातल्या कार्यक्रमामध्ये तिला डोक्यावर घेऊन मिरवलंय.माझा नवरा पैशांच्या मागं जाणारा आहे, तुमच्याकडचे पैसे पाहून तो तुमच्याकडे येत आहे, बांगर फक्त पैशाच्या मागं लागलेली लोक आहेत, असंही या महिलेने या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
तर पुढे ही महिला म्हणते, जर तो चांगला असता तर त्याने मला नांदवलं असतं, आणि मग तो राजकारणात उतरला असता, मी छोटे मोठे काम करते, मी अभ्यास करून काम शोधते, माझ्या लेकराला कधी पाहायला देखील आला नाही, मी जी पोस्ट केली त्यासाठी त्यानेच मला मजबूर केलं आहे. माझ्या सासऱ्यांना सांगितलं होतं, मला माझ्या लेकऱ्याला काहीतरी द्या, मी आजही तिथं जायला तयार आहे, सासरी राहायला तयार आहे, पण मला तिथं ते घेऊन जात नाहीत, असंही ही महिला त्या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटलं आहे.
माझी नणंद सर्वांना शिकवते. मला मारहाण करतात. माझ्या चरित्र्यावर संशय घेतात आणि काहीही बोलतात. त्यांची वागणूक चांगली नाही आणि तेच माझ्यावरती आरोप करतात, माझ्यावर घाणेरडे आरोप करतात. मला नांदवायला सांगा, नाहीतर त्याला मला आर्धी संपत्ती द्या, आपण बसून बोलू असं ते म्हणालेले, त्यांच्याशी तुम्ही बोला आण्णा, मला जाताना त्याने घाण घाण शिव्या देऊन गेला आहे, त्याना माझं किंवा माझ्या लेकरांचं काही पडलं नाही, माझ्या सासूने मला वाईट वागणूक दिली असा आरोपही त्या महिलेने केला आहे.