नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आरोप-प्रत्यारोप होत असून त्याची या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पालकमंत्रिपदाचा तिढा आणि शरद पवारांच्या खासदारांना फोडण्याबाबतच्या बातम्यांवरही चर्चा झाल्याची शक्यता आहे. या भेटीची गुप्तता पाळण्याचा अजित पवारांकडून प्रयत्न झाला. 


बीडचा मुद्दा हा देशभर गाजत आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांसोबत सत्ताधारी नेत्यांकडूनही होताना दिसत आहे. राज्याच्या राजकारणावर अमित शााहंची नजर असून याच विषयावर त्यांनी अजित पवारांकडून माहिती घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या प्रकरणाची चर्चा 


अजित पवार दिल्लीत आल्यानंतर त्यांचा कार्यक्रम निश्चित नव्हता. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या घरातून त्यांनी थेट अमित शाहांचे निवासस्थान गाठलं. पालकमंत्रिपदासाठी ही भेट होती असं जरी सांगण्यात येत असलं तरी बीडच्या प्रकरणावरच प्रामुख्याने चर्चा झाल्याची शक्यता आहे. बीडच्या प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झाले असून सरकार कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय. 


या आधी बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडेंनीही भेट घेतली


या आधी खासदार बजरंग सोनवणे आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनीही अमित शाह भेट घेतली होती. त्यानंतर आता अजित पवारांनीही अमित शाहांची भेट घेतल्याने बीडचा मुद्दा हा केंद्रस्थानी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


धनंजय मुंडेंना अजितदादांकडून तुर्तास अभय


संतोष देशमुख प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. मात्र जोपर्यत धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरावा मिळणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करणार नाही अशी भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून दूर करा अशी मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. सुमारे सव्वा तास मुंडेंनी अजित पवारांशी चर्चा केली आणि बीडची स्थिती समोर ठेवली. त्यानंतर आता अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी भूमिका घेतली असल्याची माहिती आहे. 


ही बातमी वाचा: