बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज जिल्ह्याच्या प्रशासकीय बैठकीसाठी आले आहेत. सकाळी अजित पवार हे हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालयाच्या परिसरात दाखल झाले. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगेच आपल्या कामाला आणि भेटीगाठींना सुरुवात केली. यावेळी काही लोक अजित पवार यांना भेटले. त्यांच्याशी बोलताना अजित पवार यांनी बीडमधील (Beed News) जनतेने डोक्यातून जातीचे खूळ काढले पाहिजे, असे आवाहन केले.

Continues below advertisement

कुठंतरी मागे झालेल्या चुका आता टाळल्या पाहिजेत. आता आपल्याला नवीन पिढीसाठी काहीतरी केले पाहिजे. तुम्ही थोडं दम धरा, मी काय करतो ते बघा. बीडमध्ये अनेक गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न आहे. एकदा डोक्यातील जातीचं खूळ काढून टाका. सगळी हाडामासांची माणसं आहेत, सगळ्यांचं रक्त लालच आहे. परंतु, मी इथलं राजकारण गेली अनेक वर्षे बघतोय, जातीच्या मुद्द्यावरुन समाजात फूट पाडायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची, हे सुरु आहे. इतक्या वर्षांमध्ये बीडला किती मंत्रीपदं आणि पदं मिळाली, पण विकास काय झाला, याचा विचार केला पाहिजे. मी महापुरुषांच्या पुतळ्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कुठल्याही महापुरुषांविषयी माझ्या मनात श्रद्धेची, मानाची आणि आदराची भावना आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

धनंजय मुंडेंच्या जागी मंत्री होण्यासाठी प्रकाश सोळंकेंची तयारी, म्हणाले....

अजित पवार यांच्या बीड दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांना काही प्रश्न विचारले. धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित नसतात, याविषयी त्यांना विचारण्यात आले असता त्यांच्या चेहऱ्यावर सूचक हास्य उमटले. धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद रिकामं झाले आहे, तुम्हाला मंत्री व्हायला आवडेल का? त्यावर प्रकाश सोळंके यांनी म्हटले की, का आवडणार नाही? कोणाला मंत्री व्हायला आवडत नाही, असे सोळंके यांनी म्हटले. 

Continues below advertisement

बीडमध्ये अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

गेल्या नऊ दिवसांपासून बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिक्षकांचे उपोषण सुरु आहे. आत्महत्याग्रस्त धनंजय नागरगोजे यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळेचे कर्मचारी, शिक्षक आक्रमक झाले होते. या आंदोलकांनी अजित पवारांच्या गाड्यांचा ताफ अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार यांनी आंदोलकांपैकी तीन जणांना पक्ष कार्यालयात निवेदन घेऊन बोलावून घेतले. त्यांच्या मागण्या सोडवण्यासारख्या असतील तर त्यांच्याशी बोलू, अशा सूचना अजितदादांनी पोलिसांना दिल्या.

आणखी वाचा

मिटींग सुरु झाल्यावर हे माहिती नाही, ते माहिती नाही खपवून घेणार नाही, मला अप टू डेट माहिती हवेय; अजितदादांच्या अधिकाऱ्यांना सूचना