बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा अशी ओळक असलेल्या बीड जिल्ह्यातील बीड (Beed) विधानसभा मतदारसंघात यंदाही क्षीरसागर घराण्यातच लढत होत आहे. क्षीरसागर चुलत्या-पुतण्याची लढत अशी ओळख असलेली बीड विधानसभेची लढत यंदा चौरंगी होत आहे. येथील विधानसभा मतदारसंघांमध्ये पारंपारिक क्षीरसागर चुलत्या पुतण्यामध्ये संघर्ष होत असतो. मात्र, लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती घेतल्या होत्या, त्यात सर्वाधिक इच्छुक हे बीड विधानसभा मतदारसंघातून आल्या होत्या. पण, ऐनवेळी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी आपली भूमिका स्पष्ट करत निवडणूक लढवत नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, जरांगे समर्थक असलेल्या अनिल जगताप यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, अंतिम लढतीत बीड विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.
बीड विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना असतानाही दोन अपक्ष उमेदवारांचा अर्ज आल्याने ही निवडणूक चौरंगी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीकडून योगेश क्षीरसागर निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना दोन अपक्षांचे आव्हान असणार आहे. त्यामध्ये, मनोज जरांगे पाटील समर्थक अशी ओळख असलेल्या अनिल जगताप हेही निवडणूक लढवत आहेत. तर, मराठा आरक्षणासाठी दीर्घकाळ लढा देणाऱ्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याही अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीत बीडकर कोणाच्या पारड्यात आपलं वजन टाकतात ते पाहावे लागेल.
बीडमधून लोकसभा निवडणुकीत कोणाला लीड
लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलनाचा परिणाम दिसून आला. येथील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. त्यामध्ये, बीड जिल्ह्यातील 6 पैकी 3 मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना मताधिक्य मिळालं आहे. त्यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघातूनही लीड मिळाला आहे. बीड विधानसभा मतदारसंघातून सोनवणे यांना 61 हजारांचा लीड आहे, त्यांना गेवराई आणि केज मतदारसंघातून मताधिक्य मिळालं आहे. तर, पंकजा मुंडे यांना माजलगाव, आष्टी आणि परळी या 3 विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळाली. त्यामुळे, बीड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण पॅटर्नचा इम्पॅक्ट होणार का, हे पाहावे लागेल.