Beed News : परळी येथील वैद्यनाथ मंदिराच्या (Shri Vaidhynath Jyotirling Temple) परिसरात कामगारांनी रात्रीच्या सुमारास चूल मांडून ऑमलेट, मांस शिजवलं असल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भाजप पदाधिकारी योगेश पांडकर यांनी हे प्रकरण लावून धरलं, आणि श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सदस्य राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम हे नगरपरिषद करीत असून या कामावर नियंत्रण नगर परिषदेचे असल्याचे ते म्हणाले आहेत.
दरम्यान ऑमलेट, मांस शिजविणाऱ्या कामगारांना आता कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय वैद्यनाथ मंदिर परिसरात ऑमलेट, मांस शिजवलेल्या ठिकाणाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण ही करण्यात आले आहे. यावेळी परिसरात काही काळ गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले.
भाविकांकडून गोमूत्र टाकून परिसराचे शुद्धीकरण
पुढे आलेल्या माहितीनुसार, वैद्यनाथ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत होत असलेल्या नवीन दर्शन मंडपाच्या ठिकाणी कामगारांनी आमलेट आणि मांस शिजवल्याचा प्रकार समोर आला होता. आता याच जागेचे भाविकांकडून गोमूत्र टाकून शुद्धीकरण करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे आणि भाजप पदाधिकारी योगेश पांडकर यांच्यासह भाविकांकडून हे शुद्धीकरण करण्यात आले आहे. तर दुसरीकडे हे कृत्य करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकले आहे.
टोमॅटोचा लाल चिखल तोंडाला मारून शेतकरी महिलेचा आक्रोश
बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आहे. या पावसाने मोठ्या क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अशातच टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून एका शेतकरी महिलेने टोमॅटोचा लाल चिखल करून तोंडावर मारून आक्रोश केलाय. लालाबाई जयराम धोंडे यांनी एक एकरभर टोमॅटोची लागवड केली होती. उन्हाळ्यात ठिबकवर पाणी देऊन टोमॅटोचे चांगले उत्पादन काढण्यात आले. मात्र बाजारात जाण्यापूर्वीच पाऊस झाला आणि या पावसाने टोमॅटोचा लाल चिखल झाला. डोळ्यादेखत ही अवस्थापाहून लालाबाई यांनी या टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश व्यक्त केला. या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकरी महिलेने केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या