Beed Jail War Walmik Karad बीड: बीड जिल्हा कारगृहात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) यांना गिते गँगचे आरोपी महादेव गिते (Mahadev Gite) आणि अक्षय आठवले यांच्याकडून मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. पण बीड पोलिसांनी या दाव्याचं खंडन केलं आहे. तसेच वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप महादेव गितेच्या पत्नी मीरा गिते यांनी फेटाळला आहे.
बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड सुदर्शन घुलेंना मारहाण नाही झाली. तर त्यांच्याच गुंडांकडून त्यांच्या टोळीकडून महादेव गिते यांना मारहाण झाली, असल्याची माहिती महादेव गिते यांची पत्नी मीरा गिते यांनी दिली आहे. तसेच बीडचा कारागृह प्रशासन पूर्णतः वाल्मिक कराड यांच्या बाजूने असून तीन दिवसांपासून प्लॅनिंग करून ही मारहाण करण्यात आल्याचा आरोपही मीरा गिते यांनी केला आहे. तसेच बीडच्या पोलीस अधीक्षकांना भेटून घटनास्थळाचा सीसीटीव्ही मागणार असल्यासही मीरा गिते यांनी सांगितले. मलाही माहिती मिळाली आहे. जेल अधिक्षकांच्या केबिनमध्ये बसून वाल्मिक कराडने रचला मारहाणीचा प्लॅन रचला. महादेव गितेसोबत फोनवर माझंही बोलणं झालेलं आहे, असंही मीरा गिते म्हणाल्या.
महादेव गितेसह 4 आरोपींना हर्सूल कारागृहात हलवले-
बीड जिल्हा कारागृहातून महादेव गितेला दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा महादेव गितेवर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर महादेव गितेसह 4 आरोपींना हर्सूल कारागृहात हलवल्याची माहिती समोर आली आहे.
वाल्मिक कराडला तीन-चार चापट्या मारल्या- अंजली दमानिया
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या अतिशय जवळचा आहे. जावई असल्यासारखं त्याला सारखं प्रोटेक्ट करताना आपण एकदा नाही अनेकवेळा बघतोय. वाल्मिक कराडला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय. त्याच्या छान सुखसोयी होतायेत आणि मला जी माहिती कारागृहातून मिळालीये आणि ती अगदी ऑथेंटिक आहे. वाल्मिक कराडला तीन चार चापट्या मारल्या होत्या. त्यांच्यात भांडणं टोकाची झाली. आरडाओरडा टोकाचा झाला होता. पण त्यांना फक्त माऱ्यामाऱ्या होतायेत तशी मारहाण नव्हती झाली. पण वाल्मिक कराडला तीन-चार चापट्या मारल्या होत्या, असं अंजली दमानिया यांनी सांगितले. वाल्मिक कराड त्यांच्या घरचा आहे. त्याच्या सुखसोयी ठेवून महादेव गितेची रवानगी आता दुसऱ्या ठिकाणी केली. त्यात काहीच नवल वाटत नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या.