Beed Crime News : कोचिंग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी पीडित मुलीने बालकल्याण समिती समोर सांगितली आपबिती
Beed Crime News: बीड मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणा बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित मुलीने बालकल्याण समिती समोर गुन्ह्यातील संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय.

Beed Crime News: बीड मधील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणा बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित मुलीने बालकल्याण समिती समोर गुन्ह्यातील संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय. पीडित मुलीला बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले. यावेळी पीडित मुलीने बालकल्याण समितीसमोर संपूर्ण घटनाक्रमाचा उलगडा केला. यात शिक्षक प्रशांत खाटोकर याने सर्वाधिक त्रास दिला असल्याचे पीडित मुलीने सांगितलंय.
पीडित मुलीने बालकल्याण समिती समोर सांगितलेला घटनाक्रम
शिक्षक प्रशांत खाटोकर मला सतत बॅडटच करत होता. त्याने केबिनमध्ये बोलावून मला कपडे काढायला लावले, माझे फोटोही काढले. मी त्याला प्रतिकार केला, लाथा-बुक्क्यांनी त्याला मारले, पण तो ऐकत नव्हता. सहनशीलतेचा अंत झाला म्हणून मी पोलिसांत तक्रार दिली. त्याला अद्दल घडली पाहिजे, अशा शब्दांत पीडीतेने बालकल्याण समितीसमोर आपली आपबिती मांडली.
लेकीचा झालेला छळ ऐकून आई-वडिल धाय मोकलून रडले
सोमवारी पीडीतेला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. यावेळी तिने समितीसमोर सगळा घटनाक्रम उलगडला. खाटोकरने तिला सर्वाधिक त्रास दिला. वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर त्याचे माझ्याशी वागणे चांगले नव्हते. हिने मला एक प्रश्न विचारला आहे. त्याचे उत्तर मी देणार आहे. असे म्हणून तो क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावत होता. तो ऐकत नव्हता, तर विजय पवारने हाच प्रकार केल्याचे पीडीतेने म्हटले आहे.
पीडितेस महिला सहायक
बालकल्याण समितीने पीडीतेची स्थिती पाहून तिला एक महिला सहायक दिली आहे. तिचे समुपदेशन करुन धक्क्यातून बाहेर पडण्यास मदत करणे, करिअरच्या दृष्टीने मदत करणे, आत्मविश्वास उंचावणे, कायदेशीर मदत ही कामे महिला सहायक करेल. या निर्णयामुळे पीडीतेला मदत होईल.
माहिती पुरावे असल्यास सादर करण्याचे बीड पोलिसांचे आवाहन
बीड जिल्ह्यातील एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये दोन शिक्षकांनी नीटच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ आणि छेडछाड केल्याने जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन नराधम शिक्षकांचे नाव असून या दोन्ही शिक्षकांविरोधात पोस्को कायद्या अंतर्गत बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचे पडसाद आता संपूर्ण बीडसह राज्यात उमटत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल असून दोन्ही शिक्षक अटकेत आहेत.
दरम्यान, सदर प्रकरणाबाबत आणखी कोणी पीडित असेल किंवा कुणाला काही अधिक माहिती अथवा पुरावे सादर करायचे असतील तर त्यांनी पोलीस अधीक्षक किंवा शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे. माहिती व पुरावे सादर करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जाणार असल्याची हमी देखील बीड पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























