औरंगाबाद : वाढत्या कोरोना बाधित रुग्णसंख्येमुळे औरंगाबाद जिल्ह्यात 11 तारखेपासून अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. तर शनिवार आणि रविवार पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. हे निर्बंध 4 एप्रिलपर्यंत असणार असणार आहेत. शहरात लॉकडाऊन संदर्भात आज बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त, ग्रामीणच्या एसपी यांच्यामध्ये ही बैठक झाली.


काय आहेत निर्बंध?




  • राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, आंदोलन, स्विमिंग पूल, शाळा, महाविद्यालय बंद राहणार.

  • या कालावधीत लग्न समारंभ होणार नाहीत.

  • हॉटेल, बार रात्री 9 नंतर बंद राहणार. 9 पर्यंतही 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यात येतील.

  • शनिवारी आणि रविवार शहरात पूर्ण लॉकडाऊन असेल.

  • वैद्यकीय सेवा, फळ विक्रेते, गॅस उद्योग कारखाने, सुरू राहतील.

  • किराणा सुरू राहणार, मात्र मॉल बंद.

  • बुधवारपासून बाजार समिती बंद राहणार.

  • ज्यांचं लग्न पूर्वीच ठरले आहेत, त्यांना रजिस्टर लग्न करण्याचा सल्ला.

  • 11 मार्चपासून ते 4 एप्रिल सगळी पर्यटनस्थळ बंद, वेरूळ, अजिंठा, बिबीचा मकबराही बंद.


कोरोनाचा लोकप्रतिनिधींना विसर
एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे पंढरपूर येथील जिल्हापरिषद सदस्य रमेश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज पंढरपूर जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सकाळी 11 वाजता शाळेच्या वाढीव वर्गखोल्यांचे भूमिपूजन कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला कुठलीही पोलिसांची परवानगी घेण्यात आली नाही. या कार्यक्रमात शेकडो लोक विनामास्क पाहायला मिळाले. स्टेजवर असलेल्या बहुतेक लोकांनी मास्क घातलेले नव्हते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, जि. प. शिक्षण आणि आरोग्य सभापती अविनाश गलांडे, उपाध्यक्ष गायकवाड, जि. प. सदस्य सय्यद कलीम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर मास्क आदींची पूर्तता आयोजकांकडून करण्यात आलेली नव्हती. या ठिकाणी उपस्थित शेकडो नागरिकांना नाश्त्याची सोय करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धोकादायकरित्या नाष्टा बनवणे आणि वितरित करणे सुरू होते. हा नाश्ता मिळवण्यासाठी लहान मुलांची झुंबड देखील उडाली. त्यामुळे नियम सर्वसामान्यांसाठी आहेत का राजकारण्यांसाठी नाही हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. आता प्रशासन यांच्यावर काही कारवाई करणार का हेदेखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 10 हजारांहून जास्त कोरोनाबाधितांची नोंद
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काल सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सरकार आणि स्थानिक प्रशासन सातत्याने राज्यातील जनतेला कोरोनाच्या नियमांचं सक्तीने पालन करण्याचं आवाहन करत आहे. तरीही नागरिक या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत.