औरंगाबाद : शहरातील पाणी प्रश्न गंभीर बनला असून, यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तर याच मुद्द्यावरुन आता एमआयएम आणि शिवसेना आमने सामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे याच पाणी प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री शहरात एकटे फिरल्यास लोक त्यांना मारतील असं म्हणणारे जलील त्याच पक्षासोबत युती करण्यासाठी महिन्याभरापासून मागे लागले असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.


औरंगाबादमधील पाणी प्रश्नावरुन खासदार इम्तियाज जलील यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरात एकटं फिरुन दाखवावं, त्यांना शहरातील महिला हातातील हंड्यांनी मारतील, असं जलील यांनी म्हटलं होता.


याबाबत 'एबीपी माझा'सोबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "इम्तियाज जलील विकासाच्या गप्पा मारतात मात्र, प्रत्यक्षात काहीही करत नाही. पाच वर्षे आमदार, तीन वर्षे खासदार राहिले पण एखाद्या गल्लीचा तरी त्यांनी विकास केला का? विकासाच्या गप्पा मारायच्या आणि रजाकारांचा अजेंडा राबवायचा असे जलील आहेत." तर मुख्यमंत्री शहरात एकटे फिरल्यास लोक त्यांना मारतील असं म्हणणारे जलील त्याच पक्षासोबत युती करण्यासाठी महिन्याभरापासून मागे लागले असेही दानवे म्हणाले. त्यामुळे त्यांनी बोलघेवडेपणा बंद करावा अशी प्रतिक्रियाही अंबादास दानवे यांनी दिली आहे. 



काय होता जलील यांचा प्रस्ताव?
काही दिवसांपूर्वी जलील यांनी 'एबीपी माझा'ला मुलाखत देताना महाविकास आघाडीतील पक्षांसोबत युती करण्याची इच्छा बोलवून दाखवत, तसा प्रस्ताव सुद्धा राष्ट्रवादीचे नेते तथा आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे दिला असल्याचा खुलासा केला होता. तर तीन चाकी आघाडीत चौथं चाकही जोडून घ्या असं जलील म्हणाले होते. तसेच भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं असेही जलील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला होता. तर भाजपकडूनही जोरदार टीका झाली होती.