Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar)  तीसगाव परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावर 21 ऑगस्टला एक दुर्दैवी घटना घडली होती. एका 18 वर्षांच्या मुलासह त्याच्या आई आणि वडिलांचा डोंगरावरून खाली कोसळून मृत्यू झाला होता. कुणाल मुरलीधर चांदगुडे, मुरलीधर चांदगुडे, संगीता चांदगुडे अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. दरम्यान, खवडा डोंगरावरील चांदगुडे कुटुंबाच्या दुर्दैवी घटनेची आठवण ताजी असतानाच, पुन्हा एक व्यक्ती त्याच धोकादायक ठिकाणी गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज सायंकाळी चार वाजता घडली आहे.

Continues below advertisement

नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती खवडा डोंगरावरील याच ठिकाणी गेली होती. खाली उभ्या असलेल्या नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. परिस्थिती लक्षात येताच नागरिकांनी वरून आवाज देत त्या व्यक्तीला धोकादायक भागापासून दूर जाण्याची विनंती केली. हा व्यक्ती नेमका कोणत्या कारणासाठी त्या ठिकाणी गेला होता, याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळली.

खवडा डोंगरावरील धोकादायक ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, प्रशासन आणि पोलिसांकडून सूचना

खवडा डोंगरावरील धोकादायक ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, याबाबत प्रशासन आणि पोलिसांकडून यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. तरीही अशा ठिकाणी जीव धोक्यात घालून जाणाऱ्या व्यक्तींविरोधात आता सोशल मीडियावर आणि नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.चांदगुडे कुटुंबाच्या घटनेनंतरही अशा प्रकारे धोकादायक ठिकाणी जाणे कितपत योग्य? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने या परिसरात अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

Continues below advertisement

21 ऑगस्टला खवड्या डोंगरावर घडली होती धक्कादायक घटना

कुणाल चांदगुडेचा आ पल्या वडिलांसोबत वाद झाला होता. Apple कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी हट्टाला पेटलेला मुलगा जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. त्यानंतर तो सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.