Marathwada Teacher Constituency Election : राज्यात होत असलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली आहे. सोळुंकेंच्या बंडखोरीच्या निर्णयानंतर पक्षातून त्यांची हाकलपट्टी करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी पत्र काढले आहे. ज्यात सोळुंके यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून विक्रम काळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदीप सोळुंके यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती. अर्ज मागे घेण्याच्या सूचना त्यांना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही सोळुंके यांनी आपण निवडणूक लढवणारच अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे अखेर सोळुंके यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी केली आहे. 


अखेर सोळुंकेंची हकालपट्टी! 


राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघात विक्रम वसंतराव काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून अधिकृतरीत्या उमेदवारी देऊन "AA " व “BB" फॉर्म देण्यात आले आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचेही उमेदवार आहेत. मात्र असे असतांना प्रदीप सोळुंके यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द अर्ज भरला होता. आज शेवटच्या दिवशी सोळुंके यांना कळवूनही त्यांनी अर्ज मागे न घेता पक्षशिस्तीचा भंग केलेला आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती गर्जे यांनी दिली आहे.


विभागातून 14 उमेदवार रिंगणात 


औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.
 
डॉ.गणेश वीरभद्र शेटकर (अपक्ष)  या एका उमेदवाराने शिक्षक मतदार संघ निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर सद्या काळे विक्रम वसंतराव (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),प्रा.पाटील किरण नारायणराव (भारतीय जनता पार्टी), माने कालीदास शामराव (वंचित बहुजन आघाडी), अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील (अपक्ष), प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर)  (अपक्ष), आशिष (आण्णा) आशोक देशमुख (अपक्ष), कादरी शाहेद अब्दुल गफुर (अपक्ष), नितीन रामराव कुलकर्णी (अपक्ष), प्रदीप दादा सोळुंके (अपक्ष), मनोज शिवाजीराव पाटील  (अपक्ष), विशाल (विक्की) उद्धव नांदरकर (अपक्ष), सुर्यकांत संग्राम विश्वासराव (अपक्ष), संजय विठ्ठलराव तायडे (अपक्ष), ज्ञानोबा चिमनाजी डुकरे (अपक्ष) असे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.