Nagpur News: राज्यातील घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला पुढचा 15 दिवसात मोफत वाळू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना (Gharkul Yojana Maharashtra 2025) या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी दिली आहे. या योजनेनुसार घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू मिळणार आहे.
पुढील 15 दिवस पाच ब्रास वाळू मोफत मिळणार
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नागपूर विभागातील घरकुलांसाठी नि:शुल्क वाळू उपलब्ध करून द्या, असा आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि तहसिलदारांना दिले होते. यात नागपूर विभागातील घरकुल योजनेच्या 5 ब्रासपर्यंत निःशुल्क वाळू उपलब्ध देण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे घरकूलाच्या लाभार्थ्यांना सरकारचा मोठा दिलासा मिळालाय. यावेळी तहसीलदारांना जवळचा वाळूगट नमूद करून पात्र घरकुल लाभार्थ्यांना अर्जाविनाही ऑनलाईन पास उपलब्ध करून द्यावे, असेही सांगण्यात आलं होतं. अशातच आता राज्यातील सर्व घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील 15 दिवस पाच ब्रास वाळू मोफत मिळणार असल्याचा निर्णय राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घेतला असल्याचे स्वत: त्यांनी सांगितले आहे.
राज्यात सर्वत्र वाळू माफियाचा राज, सरकारला घरचा आहेर
दरम्यान, याच संदर्भात बोलताना नुकतेच मंत्री आशिष जयस्वाल यांनी महायुती सरकारला घरचा आहेर देत राज्यात सर्वत्र वाळू माफियांचा राज सुरू असल्याचे भाष्य केलं होतं. राज्य सरकारने वाळूविषयक धोरण लागू केले असतानाही राज्यात सर्वत्र वाळू माफियांचा राज सुरु आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना वाळू मिळणे दुरापास्त झाले आहे, अशी कबुली राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ऍड. आशिष जयस्वाल यांनी दिली.
नुकतेच, गडचिरोली येथे ऍड. आशिष जयस्वाल यांनी गडचिरोली नियोजन भवनात खरीप हंगामाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. घरकुल बांधकामासाठी नागरिकांना वाळू उपलब्ध होत नसल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री जयस्वाल म्हणाले, सर्वसामान्यांना घरकुल बांधकामासाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी आणि वाळूचा काळाबाजार थांबावा, या हेतूने राज्य सरकारने नवे वाळू धोरण लागू केले आहे. त्यानुसार संबंधित तहसीलदाराने घरकुल लाभार्थीस 5 ब्रास वाळू 650 रुपये दराच्या ऑफलाईन रॉयल्टीने घरपोच उपलब्ध करुन द्यावयाची आहे. परंतु प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. असेही तेव्हा ते म्हणाले होते.
इतर महत्वाच्या बातम्या