मुंबई : पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि दूरदृष्टीतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या (Ashadhi Wari Pandharpur) पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, उपचार आणि ‘चरणसेवा’  (Charanseva) करण्यासाठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

5 हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सज्ज

आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गाभा आहे. या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सज्ज असून, त्यांच्याद्वारे ‘चरणसेवा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश आहे.

या सेवेद्वारे दररोज दीर्घ पल्ल्याच्या प्रवासानंतर थकलेल्या वारकऱ्यांच्या पायांना शास्त्रोक्त पद्धतीने व फिजिओथेरपीच्या माध्यमातून विश्रांती आणि आराम दिला जात आहे. सूजलेले पाय, बोटांतील जळजळ, तळपायातील वेदना यावर तत्काळ उपचार करण्यासाठी आरोग्य पथक सज्ज आहे. तसेच, या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहितीही दिली जात आहे.

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची!

वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण 43 ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. या मुक्कामाच्या ठिकाणीच ‘चरणसेवा’ दिली जात असून, तेथे सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. दिंडी मार्गावरील स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने ही सेवा दिली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही या सेवेत सक्रिय सहभाग असणार आहे.

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी कक्षाच्या पुढाकारातून ‘चरणसेवा’ दिली जात आहे. गरजेनुसार वारकऱ्यांना आरोग्यविषयक इतर सुविधाही पुरविण्यासाठी संपूर्ण टीम सज्ज आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांची माहितीही वारकऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती मंत्रालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्याकडून देण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या: