नागपूरः नेहमीप्रमाणे यंदाही भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाचा अंदाजापेक्षा एकदम उटल परिस्थिती निर्माण झाली. जून महिन्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून लवकर दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची स्थिती आहे.


सर्वाधिक पावसाच्या तीन महिन्यांपैकी जून संपून जुलै महिन्याला सुरूवात झाली आहे. जूनमध्ये नागपूर जिल्ह्यातच नव्हे, संपूर्ण विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. 1 ते 30 जून दरम्यान विदर्भात सरासरीच्या (175 मिलिमीटर) केवळ 61 टक्के (106 मिलिमीटर) बरसला, जो 39 टक्के कमी आहे. हवामान विभागानुसार, विदर्भात आतापर्यंत सर्वात कमी पाऊस यवतमाळ जिल्ह्यात 85 मिलिमटर पडला असून अमरावती व वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 91 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 136 मिलिमीटर पाऊस पडला. पावसाची आतापर्यंतची आकडेवारी लक्षात घेता, विदर्भातील सर्वच जिल्हे सध्या 'डेंजर झोन'मध्ये आहेत. त्यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.


बळीराजाच्या सर्व आशा आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांवर आहे. या महिन्यांत समाधानकारक पाऊस पडला तरच चांगले पीक होणार आहे. 16 जूनला मॉन्सून दाखल झाल्यापासून नागपुरात केवळ एकच दिवस (23 जूनला) 60 मिलिमीटर पाऊस बरसला. त्यानंतर वरुणराजाने केवळ नावापुरतीच अधूनमधून हजेरी लावली. उशिरा आलेल्या व पुरेशा पावसाअभावी सध्या पेरण्या खोळंबल्या असून, अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, भारतीय हवामान विभागाने यंदा 103 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तो अंदाज आतापर्यंत तरी खोटा ठरला आहे.


दररोज इशारा, मात्र पाऊस नाही


प्रादेशिक हवामान विभागातर्फे दररोजच विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात येतो. ढग जमतात आणि क्षणार्धात शिकडावा करून गायब होतात. त्यामुळे आता विभागाच्याही अंदाजावर शंका व नाराजी व्यक्त केली जात आहे.