अमरावती: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्याचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांना देण्यात आले आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबद्दल आद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याने प्रकाश आंबेडकर आधी हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे. इंडिया किंवा महाविकास आघाडीचा घटक नसताना भारत जोडो यात्रेमध्ये सामील होणं आमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल, असं प्रकाश आंबेडकरांनी मत व्यक्त केलं आहे. यावर माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी थेट प्रकाश आंबेडकरांनी प्रश्न विचारत मोठं विधान केले आहे.
आंबेडकरांना काय अडचण आहे?
आजघडीला इंडिया आघाडीत 28 पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांना वैयक्तिक ओळखतात. आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल, तर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली पाहिजे किंवा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. मात्र ते कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत, याची मला माहिती नाही. मल्लिकार्जुन खर्गेंना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे? असा प्रश्न देखील पृथ्वीराज चव्हाणांनी उपस्थित केला आहे. ते अमरावतीत बोलत होते.
.. तर प्रकाश आंबेडकर देशाचे नेते होतील
प्रकाश आंबेडकर जर आमच्या सोबत आले तर देशाचे नेते होतील. ते देशातील दलितांचे एक मोठे नेते आहे. कारण देशात आंबेडकर हे नाव दुसऱ्या कोणाकडेच नाही. त्यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊन त्यांनी संसदेत आलं पाहिजे. प्रकाश आंबेडकर सर्वांना ओळखतात, त्यामुळे त्यांनी जाऊन म्हटले की मला यायचं आहे, तर त्यांना कोण नाही म्हणणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी व्यवहारिक मागणी करून बाबासाहेबांचे संविधान वाचवलं पाहिजे. अवास्तव मागणी केली तर फायदा मोदीला होतो. जास्तीत जास्त लोक उभी करून काँग्रेसचे मतांमध्ये विभाजन करणे आणि उमेदवारांना पाडणं ही मोदींची स्टॅटीजी आहे. मागच्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांमुळे मुळे आमचे नऊ खासदार पडले हे खरं आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन मल्लिकार्जुन खर्गेंना भेटने गरजेचे आहे. ते आमच्या सोबत असावे. ही इंडिया आघाडीतील प्रत्येकाची व्यक्तिगत इच्छा असल्याचे पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.
भाजपाचा आत्मविश्वास ढळला आहे
भाजपाचा आत्मविश्वास ढळला आहे. त्यामुळे त्यांनी आता अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराचा विषय समोर आणला आहे. पण, भाजपाला यात यश मिळेल असे वाटत नाही. म्हणून त्यांनी ईडी आणि आर्थिक आमिषे दाखवून पक्ष फोडण्यात काम सुरू केले आहे. तरीही, भाजपाला जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून नेत्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपाकडून धाक दाखवण्यात येत आहे. मात्र आगामी निवडणुकांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल. असे देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
ही बातमी वाचा: