अमरावती : राज्यातील रस्ते अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात सातत्याने रस्ते अपघाताच्या घटना पाहायला मिळत आहे. त्यातच, आता अमरावती शहरातील राजपेठ उड्डाण पुलावरही भीषण अपघाताची घटना घडली असून या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्या आहेत. बांधकाम साहित्याच्या दळणवळणासाठी वापरण्यात येणाऱ्या मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Continues below advertisement

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याने ही दुर्घटना घडली असून अपघानंतर ट्रक ड्रायव्हर घटनास्थळावरुन पसार झाला आहे. गौरी प्रमोद धर्माळे (वय 27) आणि हर्षा आदेश गावंडे (वय 39) अशी अपघातातील मृत महिलांची नावे आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच, मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर राजापेठ उड्डाणपूलावर वाहनांची मोठी रांग लागली होती, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचं दिसून आलं.

ठाण्यातील मीरा रोड येथेही अपघात

मिरारोड पूर्व येथील पेणकरपाडा परिसरात झोमॅटो डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला भरधाव कारने धडक देऊन फरफटत नेत गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हिट अँड रन प्रकरणाचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, काशीमीरा पोलिसांनी संबंधित कारचालकाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Continues below advertisement

धनश्याम फुलचंद गुप्ता (वय ३०) हे झोमॅटोमध्ये डिलिव्हरीचे काम करतात. २७ जुलै रोजी सकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकीवरून (एमएच-०४ एमएक्स-२३६४) डिलिव्हरीसाठी जात असताना पेणकरपाडा येथील प्रभाकर म्हात्रे यांच्या बंगल्यासमोरील बीअर शॉपजवळ मागून भरधाव आलेल्या टोयोटा हायराईड कारने (एमएच-०१ एफई-५९१९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेचा एक थरारक व्हिडीओही समोर आला असून, कार बाईकला फरफटत नेत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यानंतर या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कारचालक आरोपीचे नाव आदिल तस्लिम अन्सारी (वय २७) आहे. 

भंडाऱ्यात मुसळधार पावसानंतर वाहतुकीसाठी तीन मार्ग बंद

विजांच्या कडकडाटासह आज दुपारी सलग दुसऱ्या दिवशी भंडाऱ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचल्यानं रस्त्यालगतच्या छोट्या व्यावसायिकांची चांगलीचं दणादण उडाली. काहींच्या गाड्या पाण्याखाली आल्यात, तर काहींच्या घरात पाणी शिरलं. या मुसळधार पावसानं जिल्ह्यातील तीन मार्ग बंद वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. भंडारा तालुक्यातील कारधा, साकोली तालुक्यातील सराटी ते सोमनाळा आणि लाखनी तालुक्यातील नवेगाव कोका ते खडकी या मार्गांचा समावेश आहे. हवामान विभागनं भंडारा जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय. मुसळधार पावसामुळं ज्या शेतकऱ्यांकडं सिंचनाची व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना हा पाऊस मोठा दिलासादायक ठरला आहे. 

हेही वाचा

नागुपरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा