अमरावती: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीची झळ भारतीय नागरिकांना आणि सर्वसामान्यांना बसत असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून देशात, राज्यात व्यवसायिक गॅसचा तुटवडा जाणवत असून घरगुती गॅस सिलेंडरचे (Gas) दरही 60 रुपयांनी वाढले आहेत. त्यातच, घरगुती गॅसचा बुकींग कालावधी 45 दिवसांवर नेल्याने नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर एकच गर्दी केली आहे. तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद केल्याने काळाबाजारही वाढला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, या कारवाईत ग्राहक आणि अधिकारी यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला असून अधिकाऱ्यांनी जप्त केलेले सिलेंडर ग्राहकांनी पळवल्याची घटना घडली आहे. 

अमरावतीच्या दर्यापूरात महसूल अधिकाऱ्यांच्या कारवाईवेळी चांगलाच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर जमावाने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार दर्यापुरात घडला आहे. अमरावतीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याच्या तक्रारीवरून महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार, दर्यापूर शहरात विविध व्यावसायिकांकडून घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. दरम्यान, दर्यापूरमधील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील काही हॉटेलमधून महसूल विभागाने घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. ही कारवाई सुरू असताना परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले. यावेळी, जमावाने अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची माहिती संबधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच जप्त केलेले काही सिलेंडरही सरकारी वाहनातून काढून काहीजण ते घेऊन निघून गेल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुमारे तासभरानंतरही सिलेंडर घेऊन गेलेल्या व्यक्तींपैकी कोणीही हजर झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी, नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार, पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाईल. 

केजमध्ये ग्राहकाकडून एजन्सीतील कर्मचाऱ्याला मारहाण

गॅस टंचाईमुळे वादाचे प्रसंग घडत असून बीडच्या केज शहरातील एका गॅस एजन्सीवर गॅस बुकिंग करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने तेथील कर्मचाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून कर्मचाऱ्याला मारहाण देखील करण्यात आली. सध्या, अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, अद्याप या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हेही वाचा

महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग