Ambernath News : अंबरनाथ येथील 58 वर्षीय मीना बालाराम सूर्यवंशी यांचा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने मृत्यू झाला. पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवण्याआधीच त्यांची प्राणज्योत (Ambernath Woman Death Case) माळवली. मात्र यात नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी रुग्णवाहिका (Ambulance) पाठवण्यात आल्याने ती वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही, असा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे . मात्र, रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दुसरीकडे याच मुद्दयांवर बोट ठेवत राजकीय वातावरण देखील तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ स्वामी नगर येथील मीनाबाई सूर्यवंशी या एकट्या राहतात. त्यांना चक्कर आल्याने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काही तरुणांनी मिनाबाईंना तातडीने अंबरनाथ मधील छाया शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ठाणे किंवा मुंबईतील रुग्णालयात हलवण्याची गरज असल्याचं सांगितलं. मात्र, रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध न झाल्याने मीनाबाईंचा मृत्यू झाला, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
Ambernath Woman Death Case : रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याचा आरोप निराधार
दरम्यान, याच वेळी अंबरनाथमधील धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमासाठी छाया रुग्णालयाची रुग्णवाहिका या कार्यक्रम स्थळी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छाया उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. शुभांगी वाडेकर यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत “मीनाबाई सूर्यवंशी यांना रुग्णालयात आणण्यात आलं, तेव्हाच त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. आवश्यक प्राथमिक उपचार करण्यात आले. रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र 15 मिनिटांच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याचा आरोप निराधार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मीना बलराम सूर्यवंशी या आमच्या बी.जी छाया रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आमच्या ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्यांना तपासलं, त्यांचं पल्स, बी.पी, ऑक्सीजन लेव्हल खूप खालावलेले होते. त्यांची तब्येत चिंताजनक होती. त्यावेळीच लगेच त्यांचा ईसीजी काढण्यात आला. त्या इसीजीमध्ये खूप चेंजेस होते. नक्कीच हृदयविकाराच्या झटकेची ती लक्षण होती. त्यादरम्यान आमच्या गोल्डन आवर्समध्ये आमच्या डॉक्टर आणि स्टाफनी अति आवश्यक लागणाऱ्या इक्विपमेंट तसेच सी.पी.आर देणे. त्यासोबत इंजेक्शन आय.पी लावणे तसेच औषध देखील देण्यात आले.
Ambernath News : ट्रीटमेंट चालू असताना 15 ते 20 मिनिटात पेशंटचा मृत्यू
दरम्यान, ट्रीटमेंट चालू असताना 15 ते 20 मिनिटात पेशंटचा मृत्यू झाला. आमच्या रुग्णालयात 102, 108 ॲम्बुलन्स आहेत. पेशंटची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यादरम्यान आम्हाला ॲम्बुलन्समध्ये लगेच पाठवलं नाही. त्यादरम्यान जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. त्यादरम्यान पेशंटचा मृत्यू झालेला आहे. अशी माहिती बी.जी छाया रुग्णालयच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.शुभांगी वडेकर यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या