Ambar Kothare Passed Away : ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते आणि सिने-निर्माते अंबर कोठारे (Ambar Kothare) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. अंबर कोठारे हे अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचे वडील होय.
अंबर कोठारे यांचा जन्म 14 एप्रिल 1926 रोजी मुंबईत झाला. त्यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कोठारे यांना बालपणीच वेगवेगळी कामे करावी लागली आहेत. दिवाळीच्या काळात गिरगावात रस्त्यावर उटणे विकण्यापासून अनेक छोटी-मोठी कामे अंबर यांनी केली आहेत.
अंबर कोठारे म्हणजे बहुरंगी व्यक्तिमत्त्व!
अंबर कोठारे यांनी नोकरी करण्यासोबत रंगभूमीचीदेखील सेवा केली आहे. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. त्यांनी रंगभूमीवर अनेक नाटकं सादर केली आहेत. 'झोपी गेलेला जागा झाला' या त्यांच्या नाटकाचे शेकडो प्रयोग झाले आहेत. नाटकात अभिनय करण्यासोबत त्यांनी अनेक नाटकांची निर्मितीही केली आहे.
लोकप्रिय अभिनेते आणि सिने-निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या बालकलाकार तसेच कालांतराने निर्माता-दिग्दर्शक म्हणून झालेल्या जडणघडणीत अंबर कोठारे यांचे मोलाचे योगदान होते. महेश कोठारे यांची निर्मिती-दिग्दर्शन क्षेत्रामधील पदार्पण असलेला ‘धुमधडाका’ हा चित्रपट सर्वतोपरी चांगला होण्यासाठी अंबर कोठारे यांनी भरपूर कष्ट घेतले होते.
महेश कोठारे यांच्या प्रत्येक सिनेमात अंबर कोठारे यांचा सक्रिय सहभाग होता. 'दे दणादण' या सिनेमात अंबर कोठारे यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा अत्यंत ताकदीने साकारली होती. त्यानंतर महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या काही महत्त्वाच्या कलाकृतींमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.
‘झुंजारराव’ नाटकामधील अंबर कोठारे यांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. अंबर कोठारे यांनी उत्तम नाटकांची निर्मितीही केली होती. त्यापैकी एक प्रमुख नाटक म्हणजे ‘जेथे जातो तेथे’. या नाटकात दत्ता भट यांच्यासोबतच अंबर कोठारे यांनीदेखील अभिनय केला होता.
अभिनयाची आवड जोपासत अंबर कोठारे यांनी बॅंकेत नोकरीदेखील केली आहे. नोकरी सांभाळत त्यांनी रंगभूमीची आवडदेखील जोपासली. अंबर कोठारे यांच्या निधनाने महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.
संबंधित बातम्या